Saturday, September 17, 2011

मुख्य धारेतला प्रवाह

- सतीश काळसेकर

(तुळसी परब विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा काळसेकरांचा हा लेख ‘लोकसत्ते’त प्रसिद्ध झाला होता.)

तुळसी परब येत्या विद्रोही साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष आहे. त्याच्या या सन्मानात त्याच्या उपरोक्त वैचारिक भूमिकेचा आणि त्याच्या आजवरच्या कविता आणि कवितेतर चिकित्सक लेखनाचा सन्मान होत आहे. तुळसी परबच्या आजवरच्या जगण्याला आणि लेखनाला आरंभीचा काही काळ वगळता मार्क्सवादी विचाराची बैठक आहे. ती त्याच्या जगण्याच्या प्रत्येक व्यापारात पक्की मुरलेली तर आहेच आणि पुन्हा सतत गतिमान आणि विकसित होणारी आहे. आपल्या भोवतीचे सामाजिक जग आणि कवितानिर्मितीतली कवी म्हणून स्वीकारलेली ‘अख्खं आयुष्य पणाला लावलेली’ जबाबदारी याचे ताण आणि त्या ताणांचे संतुलन त्याच्या कवितेने पेलले आहे. किंबहुना या संदर्भात तो आजच्या मराठी कवितेत एकाकी उभा आहे. ‘साक्षात’च्या विशेषांकात त्याच्या पंचवीस नव्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्याच्या कवितानिर्मितीचा विकसित आणि एकाकी आलेख त्या कवितांत पाहता येतो.
त्याचा पहिला कवितासंग्रह ‘हिल्लोळ’ 1973 साली प्रसिद्ध झाला. तो ‘अनितकालिकां’च्या उठावाचा काळ होता. नंतरचा ‘धादांत आणि सुप्रमेय मधल्या मधल्या मधल्या कविता’ हा 1977चा. त्यात त्याच्या शहादामधल्या पूर्ण वेळ कार्यकर्ता आणि आणीबाणीतला तुरुंगवास या काळाशी संबंधित कविता आहेत. काही काळाआधी ‘पाणी’ ही त्याची दीर्घ कविता आली होती आणि नंतर ‘कुबडा नार्सिसस’ मे 2002 हा अलीकडचा संग्रह. याशिवाय त्याच्या कितीतरी कविता अजून असंग्रहित आहेत. ‘कुबडा नार्सिसस’ संग्रहातल्या कविता या प्रदीर्घ काळातल्या कविता आहेत. तो काही काळ संघटनांच्या पातळीवर कृतीशील कार्यकर्ता म्हणून वावरला आणि काही काळ प्रत्यक्ष चळवळीपासून दूर असताना जगण्याच्या व्याप्यात पत्रकारिता केली, तरीही आरंभापासून त्याचा पिंड हा आधी पूर्ण वेळ कवी असण्याचा आहे हे नजरेआड करता येत नाही. अर्थात हे असे कवी असतानाच त्याच्या त्याही काळातल्या आरंभीच्या कवितात त्याच्या पुढच्या मार्क्सवादी असण्याच्या खुणा सापडतात. भवतालाच्या, शोषितांच्या, पीडितांच्या, वर्गीय पातळीवर तळाला असणाऱ्यांच्यात त्याची मुळे पसरणार हे अपरिहार्यच होते. प्रत्यक्ष जगणे आणि कविता यातले अंतर मिटवू पाहणाऱ्या त्याच्यातल्या कवीला जगण्याच्या लढाईत शोषितांच्याच बाजूने उतरणे निकडीचे होते. त्या वर्गाशी त्याची नाळ जन्मदत्तच जोडलेली होती.
‘हिल्लोळ’मधल्या कवितांपासूनच तुळसीच्या वर्गभानाचा प्रवास सुरू झाला आहे. ‘धादांत-’मध्ये त्याचा हा प्रवास खूप थेट आणि कविताबंधाबाबतही अधिक समजूतदार झाला आहे. नामदेव ढसाळची ‘प्रियदर्शनी’ ही कविता नामदेवच्या भूमिकेवर बिनतोड आणि नीट बांधलेली आहे. पण त्याच्यासमोरच तुळसीची ‘धादांत-’मधली एकसष्ट क्रमांकाची कविता ‘मला केवढं आवडेल, झारिना / तुला एकटीला रडताना पाहून’ ही कविता ठेवावयास हरकत नाही. त्यातल्या अखेरच्या ओळी ‘झारिना, तुला नाही दोष देता येणार / एकटीला कारण तू स्वीकारलयस / या दुधखुळ्या नाटकात मूळ काय’ या ओळी तुळसी परबचा समजूतदारपणा, करुणा आणि तरीही जागत्या मार्क्सवादी द्वंद्वात्मक भूमिकेचे भान अधोरेखित करतात.
त्याची आधी फोल्डरच्या आकारात प्रसिद्ध झालेली ‘पाणी’ ही दीर्घ कविता ‘कुबडा नार्सिसस’मध्ये आली आहे. त्या कवितेच्या नवव्या छेदातल्या या काही ओळी :
समष्टी
          सगळी कष्टीय :
हे सगळे पाण्याच्या पापाचे पाढे
मी वाचता वाचताच निग्रह
          विख्यात होत जातोय.
मी तुम्हाला सांगतोय
ती सगळी पाण्याची हकिगत नाही
ही हकिगत आहे
पातळ्यांवर
जगणाऱ्या दुर्दम्य माणसांची
ही एक प्रच्छन्न व्यथा आहे
नी नुक्ती नुक्ती मिटत चालली आहे
ती संपतेय खाणीतल्या हरताळात
ती हेलावतेय वरळीच्या बहिष्कारात
ती चाचपडतेय नक्सलबाडीच्या उठावात
ती हकीगत आहे
व्याकुळता सोडून सुदृढपणे जगाकडे पहाणारी
‘पाणी’ ही दीर्घ कविता पाण्याचे भूतकाळातले आणि वर्तमानकाळातले संदर्भ आणि संघर्षही जागे करणारी मराठीतली महत्त्वाची कविता आहे. कविता ही अशी काही ओळींतून आणि गद्यसदृश छपाईतून व्यक्त करणे कवितेला अन्यायकारक आहे. पण किमान तितके तुमच्यापर्यंत न्यावे यासाठीचा हा प्रयत्न केला.
तुळसीने मनोहर ओकच्या निमित्ताने लिहिलेले लेखन, त्याची ‘साक्षात’मधली मुलाखत, काही प्रकाशित-अप्रकाशित टिपणे, ‘भारतभवन’साठी झालेली त्याची मुलाखत आणि आणखी एखादा मोठा संग्रह प्रकाशित व्हावा इतक्या असंग्रहित कविता आता या निमित्ताने तरी एकत्र व्हाव्यात. त्याचे समकालीन वाङ्मयीन संस्कृतीवरचे भाष्य त्याच्या अध्यक्षीय भाषणातून समोर येईलच आणि तो आपणा सर्वांसाठी त्याच्या अध्यक्ष होण्याच्या सन्मानाचा आनुषंगिक फायदा असणार आहे. तुळसी परब त्याच्या कवितेवरील आणि शोषितांविषयीच्या अविचल निष्ठेमुळे आज सन्मानित झाला आहे.
सुरुवातीच्या अवतरणात तुळसी परब यांनी ‘मूलभूत लोकशाही आणि अनेकानुवर्तिता (प्लुरॅलिझम)’ यांचा उल्लेख केला आहे. ‘बहुजन जागा होत आहे’ याचे त्यांना भान आहे. त्यांच्या लेखनाच्या उमाळ्यांविषयी त्यांना सहानुभूती आहे. येत्या काळात हे जागे होत जाणे विस्तारतच जाणार आहे. मराठीची प्रस्थापित धाराही त्याला थोपवू शकणार नाही. प्रा. केशव मेश्राम यांचे नाशिकच्या संमेलनातले अध्यक्ष होणे हा आता अपघात किंवा योगायोग नाही. त्या आधीही घडलेल्या घटना आणि अध्यक्षीय निवडी हा अपघात किंवा योगायोग नाहीत. हे असे घडणे अपरिहार्यच आहे.
तुळसी परब हा आज मराठीच्या मुख्य आणि म्हणावे तर प्रस्थापित धारेतलाच विद्रोही सूर आहे. त्याची कविता, त्याचे अन्य लेखन, त्याचा साहित्यजगातला वावर याच्या स्वीकाराच्या खुणा खूप पाहता येतील. तुळसी परब हा कवी म्हणून त्याच्या जागी स्वतंत्र आणि एकटा आहे हे खरेच आहे. तुळसीच्या ‘सुप्रमेय्य’ या विभागातल्या पहिल्याच कवितेतील दोन ओळींनी त्याला शुभेच्छा देतो.
आणि कितीतरी महापुरुष लागतात मरायला
साधा एक जाणिवेचा पहिला थर विस्कटायला
.
तुळसीचे हे जागते भानच त्याची कविता पुढे नेणार आहे.

No comments:

Post a Comment