Monday, September 26, 2011

तुळसीबद्दल

- वंदना सोनाळकर
'साक्षात' (जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २००४) तुळसी परब विशेषांकामधून

ज्या माणसाबरोबर आपण पंचवीस वर्षं संसार केला आहे त्याच्याविषयी लिहायचे तर मला स्वतःबद्दल आणि आमच्या कुटुंबाबद्दलही लिहावे लागेल. कदाचित या अंकाच्या वाचकांना याच्यात फारसा रस नसेल. परंतु जसा एखादा पर्यटक 'पॅकेज टूर'चे पैसे भरतो आणि त्याला व्यवस्थापकांनी निवडलेल्या सर्व स्थळांना भेट द्यावीच लागते त्याचप्रमाणे इथे कवीबद्दल वाचताना वाचकांना एक अर्थशास्त्राची शिक्षिका, एक नुकताच पदवी मिळालेला वास्तुशिल्पकार (ओजस) आणि एक दहावीतला विद्यार्थी (दर्यन) यांचीही भेट घ्यावी लागेल. हा केवळ एक स्त्रीवादी हट्ट नाही.

पंचवीस वर्षांचा काळ मोठा आहे. १९७७ ते २००२ हा काळ कवी तुळसी परब यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कवितासंग्रहामधील अंतराचा देखील आहे. कवीच्या जीवनात या काळात बरेच काही घडले, त्याबरोबर जगात आणि आपल्या समाजातही मोठे बदल झाले आहेत. कोणत्याही चांगल्या लेखकाच्या लेखनात या बदलांचे प्रतिध्वनी सापडतातच. आणि ज्या कवीच्या वैशिष्ट्यांमध्ये त्याची राजकीय बांधिलकी, त्याची समाजाभिमुख भूमिका यांचा प्रकर्षाने उल्लेख केला जातो, अशा कवीच्या जीवनात त्यांना महत्त्वाची जागा आहे. तो या बदलांना कसा सामोरा जातो, त्यांचे धक्के खातो, उभा राहतो, स्वतःला बदलतो किंवा बदलण्यास नकार देतो, हे सर्व मी जवळून पाहिले आहे. ३१ ऑक्टोबर १९७७ रोजी आमचे लग्न झाले. आम्ही विवाहबद्ध झालो, सहजीवन पत्करले. शब्द कोणतेही वापरा. तेव्हा इंदिरा गांधींची आणीबाणी नुकतीच संपुष्टात आली होती. मिसा (मेन्टेनन्स ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अॅक्ट) खाली दहा महिन्यांचा कारावास सोसून तुळसी परब मार्चमध्ये बाहेर आले होते. इंदिरा गांधींच्या सरकारचा पराभव करणाऱ्या युतीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही देशाच्या राजकारणात पुन्हा प्रवेश मिळाला होता. या घटनेचे महत्त्व आम्हाला त्यावेळी लक्षात आले नव्हते.

त्यावेळी मी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कॉलेजमध्ये शिकवत होते. मी १९७४ साली इंग्लंडहून परतले होते. त्याआधी मी लहानपणापासूनचा जवळजवळ सर्वच काळ परदेशात राहिले होते. संगमनेरसारख्या ठिकाणी नोकरी करण्याचा माझा निर्णय आणि तुळसीबरोबर लग्न करण्याचा निर्णय, हे दोन्ही धाडसाचे निर्णय होते असे म्हणता येईल. तुळसीचेही तेवढेच धाडस. मागे पाहताना असे वाटते की, एका बाजूला आम्ही दोघे अगदी एकमेकांशी जमीन-आसमानचा फरक असलेल्या वातावरणात लहानाचे मोठे झालो असलो, तरी दोघांमध्ये एक गोष्ट समान होती. दोघेही शहरी संस्कृतीत वाढलो, मात्र दोघांनीही ग्रामीण भागात राहून काम करणे पत्करले होते.

नंतर तुळसीच्या काही साहित्यिक मित्रांनी सुचविल्याप्रमाणे औरंगाबादेत विद्यापीठाची नोकरी मिळवली आणि आम्ही औरंगाबादेत १९७९ साली आलो. तेव्हापासून दोन-तीन वर्षे सोडली तर आम्ही इथेच आहोत.

तुळसीच्या स्वभावामध्ये एक विशिष्ट प्रकारचा विरोधाभास आहे. एका बाजूला त्याची साहित्य व दृष्य कलांची जाण प्रगल्भतेची, सूक्ष्मतेची आहे, तो नवीन कलाकृतींना स्वीकारण्यास नेहमी तयार असतो. दुसऱ्या बाजूला त्याच्या भाषेत आणि वागणुकीत जो रांगडेपणा आहे, तो जपण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करायला तयार असतो. त्यामुळे आमच्या सहजीवनाच्या काळात चढउतार झाले असतील, काही काळ आमच्या तीव्र संघर्ष झाला असेल, पण त्या एकत्र जगण्यात तोचतोचपणा किंवा कंटाळा याला काही जागा राहिली नाही.

आमच्या घरात सतत वाद चालू असतात आणि तेही बऱ्याचदा उच्च स्वरात. आम्ही दोघेही आपला मुद्दा सोडायला, पराभव स्वीकारायला फारसे तयार नसतो. तरीही आम्ही एकमेकांच्या म्हणण्याला किंमत देत नाही असे नाही. आमचे जवळचे मित्र प्रताप भोसले सुरुवातीच्या काळात असे म्हणायचे की, तुमच्या भांडणातून मला काही शिकायला मिळते. अर्थात आमच्या दोन्ही मुलांवर या वातावरणाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे ते देखील आमच्याशी उच्च स्वरात वाद घालायला मागेपुढे बघत नाहीत. त्यात तुळसीच्या तोंडात शिव्याही सहजपणे येतात आणि आपली बाजू कमजोर असली तर तो विवेकाचा त्याग करण्यात तत्परही असतो. तरी हा सगळा प्रकार भांडणापेक्षा वादाचाच असतो. आमचे सगळे काही एकमेकांसमोर अगदी उघड होत असते. तत्त्वांचा, सवयींचा, मूळ हेतूंचा, आवडीनिवडींचा आडवा तिडवा विचार केला जातो. यात कधीच कटुता येत नाही असे नाही. मोठ्या मुलाचा स्वभाव मुळात शांत असल्यामुळे त्याला बऱ्याच तडजोडी करून काही गोष्टी विनोदाने घेण्याचे शिकावे लागले. धाकटा मात्र तुळसीचीच रणनीती त्याच्यावर उलटवायला शिकला आहे. आणि या सर्व प्रकरणातून एक लवचिकता, खुलेपणा, स्वातंत्र्य, कसे माहीत नाही, पोचसे जाते सगळ्यांसाठी.

अर्थात या सगळ्या तीव्रतेने नटलेल्या सततच्या कौटुंबिक देवाणघेवाणीची एक किंमतही द्यावी लागते. आम्ही दोघे आपल्या क्षेत्रात काबिल असूनही फारसे महत्त्वाकांक्षी राहिलो नाही. याचाच परिणाम, तुळसीचा तिसरा संग्रह निघायला पंचवीस वर्षे लागण्यामध्ये आणि माझे करिअर पुढे न सरकरण्यामध्ये दिसून येतो.

तुळसीच्या या तिसऱ्या संग्रहाच्या काही परीक्षकांनी त्याच्या स्त्रियांविषयीच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली आहे. हे वाचून मला पहिल्यांदा थोडासा धक्का बसला, मात्र विचार केल्यानंतर फारसे आश्चर्य वाटले नाही. तुळसीच्या तोंडातून अनेकदा अत्यंत पुरुषप्रधान अशी विधाने बाहेर पडतात. त्याचे वर्तनही तसे असते. परंतु या सगळ्यामागे तुळसीच्या काही भूमिका असतात. एक, तो स्वतःला बदलायला तयार असतो. फार सहजपणे नाही, पण कालांतराने तो बदलतो. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याची वागणूक ही वर्ग-जात-लिंगभाव-सदृश अस्तित्वात पाय रोवलेली असते. तो ज्या वातावरणात आणि वास्तवात लहानाचा मोठा झाला, त्याने तारुण्यात जी मूल्ये स्वीकारली, त्यांच्यापासून फारकत घ्यायला तो सहजासहजी तयार होत नाही. तो एका विशिष्ट काळात मुंबईतील कामगार वस्तीत एका चाळीत वाढला, त्या वास्तवाशी त्याची बांधिलकी पूर्णपणे तुटत नाही. तो आज एक मध्यमवर्गीय जीवन जगत असला तरी या जीवनाशी तो कधीच समरस होत नाही. एका कामगारवर्गीय पुरुषाला एका सुखवस्तू जीवन जगलेल्या उच्चवर्णीय स्त्रीबद्दल जो संशय वाटतो, तो तुळसी नाहीसा होऊ देत नाही. वैयक्तिक पातळीवर दीर्घकाळ सहजीवनातून एक मोठा विश्वास दोन्ही बाजूने निर्माण झाला असला तरी. या भूमिकेचा मला बराच त्रास झाला आहे हे नाकारता येणार नाही. काही काळ मला स्वतःची सृजनशीलता जपण्यासाठी त्याच्यापासून जरा अंतर घेऊन राहणेही जरूरीचे वाटले आहे. मात्र तुळसीचा मोठेपणा याच्यात आहे की, मी जेव्हा इंग्रजीत वयाच्या चाळीशीनंतर काही कविता लिहिल्या तेव्हा त्याने त्याचे मनापासून कौतुक केले. माझ्या दोन-तीन कविता एका प्रतिष्ठित त्रैमासिकात छापून आल्या तेव्हा तो माझ्या आनंदात पूर्णपणे सामील झाला. मला कामाच्या निमित्ताने देशभर प्रवास करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने कधी तक्रार केली नाही.

तुळसीला शहरात फिरण्याचा मोठा शौक. आणि तेही पायी. अर्थात, महाराष्ट्रात मुंबई सोडून दुसरे खरे शहर नाही असे त्याचे मत आहे. तरी तो औरंगाबादेत असाच शौक म्हणून फिरतो. आमचा मोठा मुलगा ओजस लहान होता तेव्हा तो त्यालाही बरोबर घेऊन शहरामध्ये फिरायचा. कधीकधी 'आज शाळेत नको जाऊस. आपण फिरू या. शाळेत जेवढे शिकता येते, त्याच्यापेक्षा जास्त शाळेबाहेरही शिकायला मिळते', असे त्याचे म्हणणे असते. अर्थात मीही या 'मधून-मधून शाळा बुडवण्याच्या' छंदाला कधी विरोध केला नाही. असा तो फिरून आल्यावर आपण जर विचारले, कुठे गेलास, काय केलेस, कोण भेटले, तर याचे सरळ उत्तर मिळणार नाही. तो काहीतरी काम पूर्ण करण्यासाठी जरी बाहेर पडला असला, तरी ते झाले का? असे विचारल्यावर सोपे उत्तर मिळत नाही. तो कसा अमूक अमूक ठिकाणी गेला, मग तिथली माणसे कशी होत, ते काय काय म्हणाले, एवढेच नाही तर च्यायला ते असे का बोलले आणि आपण त्यावर काय बोललो, हे त्याच्या पद्धतीने त्याच्या वेगाने ऐकावे लागतेच. अगदी आपल्या हातात घड्याळ नसले आणि किती वाजले विचारले तरी असेच. अशा प्रकारे त्याच्याबरोबर, म्हणजे त्याच्यामागे पुन्हा शहरभर फिरून यायला कधी मजाही वाटते, पण हे सगळे ऐकत बसायला नेहमीच वेळ असतो का? आणि त्याच्या पिढीतल्या बहुसंख्य नवऱ्यांप्रमाणे, घरातली कामे करताना, आपण ही कामे करतो ही अगदी मोठ तात्विक भाषण देण्याजोगी अजब घटना आहे, असेही असते आणि शेवटी मी हे करतो ही काय अजब गोष्ट आहे का? मी तर हे अनेक वर्षांपासून रोजच करतोय... वगैरे.

आमचे लग्न झाले तेव्हा तुळसीची युरोपीय कवितांची जाण पाहून मी चकीतच झाले होते. त्या काळात पुस्तकं स्वस्त होती आणि त्याच्याकडे मार्क्सवादी साहित्याचा आणि कवितांचा मोठा संग्रह होता. आम्ही या दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचे एकत्र वाचनही केले. नंतर फारसा वेळ मिळाला नाही, तरी तुळसीकडून कविता वाचून घेण्यात मी अजूनही रमते. ग्रंथालयात आठ आठ तास बसून वाचण्याची आवड तुळसी अलिकडे वरचेवर जोपासू शकला नाही. पण त्याचे वाचन सतत चालू असते. ते सगळे गांभीर्याचे असते. तो विनोदी लेखन क्वचितच वाचतो, 'पॉप्युलर फिक्शन'ला हातही लावत नाही. आणि जे काही वाचलेले असेल ते त्याला सांगायचेही असते. मनाला ताण आल्यावर तुळसीला 'मारामारीचे' विशेष म्हणजे अमिताभ बच्चनचे चित्रपट टी.व्ही.वर पाहायला आवडतात. आणि तो या चित्रपटांच्या कथनकामध्ये अगदी लहान मुलासारखा मग्न होतो.

विज्ञान हे आपले क्षेत्र नाही, वैज्ञानिक बाबींच्या तपशिलात आपल्याला रस नाही, ही तुळसीची ठाम भूमिका असते. घरातल्या विजेच्या उपकरणांबरोबर त्याचे नाते मुळात संशय आणि किंचित भीतीचे असते. पण याबाबतच्या सुरक्षिततेचे पथ्य तो अगदी काळजीपूर्वक आणि काटेकोर पद्धतीने पाळतो. घरातल्या संगणकापासून तो दोन वर्षांच्या काळात जरा फटकूनच राहिला आहे. तात्विक पातळीवर तो विज्ञानाच्या नवीन शोधांबद्दल खुलं मन ठेवतो, पण तपशील समजून घेण्याची तसदी घेत नाही. तात्विक पातळीवर नास्तिक असणे, अंधश्रद्धांना विरोध करणे हा त्याच्या तरुणपणातील बंडाचा भाग होता आणि आजही त्याच्यासाठी ते महत्त्वाचे आहे. जिथे तो मोठा झाला तेथील कामगार वर्गीय कोकणी संस्कृती, लोकांचा भुताखेतांवरचा विश्वास, एकमेकांविषयीचा संशय, एकमेकांमध्ये गुंतण्याची पद्धत या सगळ्यांच्या विरोधात त्याने बंड केले आहे आणि तरीही त्याचा एक भावनिक प्रतिध्वनी त्याच्या बोलण्याच्या लयीत, त्याच्या वागणुकीत अजूनही उमटतो. हा एक विरोधाभास वाटला, परंतु कवी म्हणून त्याच्या लेखनात या गोष्टी एक बहुसूत्रीपणा आणतात. तुळसी एक व्यक्ती म्हणून अनेकदा काही भूमिकांना अगदी हट्टीपणाने धरून ठेवतो, मात्र त्याचे कलात्मक विश्व त्यापेक्षा गुंतागुंतीचे असते. हे समजायला मला अनेक वर्षे लागली. जेव्हा मी तुळसीला, त्याच्या घराच्या माणसांना अगदी जवळून पाहिले आणि त्यांच्याशी भावनिक नाते जोडले तेव्हा ते शक्य झाले.

कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारताना किंवा नाकारताना तुळसीने जगाशी वागताना स्वीकारलेली भूमिका त्याच्यासाठी महत्त्वाची असते. मग अगदी डॉक्टरकडे जाण्यासारखा साधा प्रसंग असला तरी हॉस्पिटलची प्रशासनपद्धती आणि त्यातील विविध पात्रे, डॉक्टरची रुग्णांशी वागण्या-बोलण्याची पद्धत, इतर रुग्णांचे वर्तन, या सगळ्यांना त्याला तीव्र वैयक्तिक आणि 'इगोवादी' प्रतिसाद द्यायचा असतो. हे सगळे खूप व्यक्तिकेंद्री वाटेल. पण तुळसीची ही स्वतःची भूमिकासुद्धा एक रचलेला आविष्कार आहे. त्याला अनेक पैलू आहेत. पण त्यात एक सामान्य जनतेतला, सत्तेपासून दूर असलेला माणूस-पुरूष हा एक अविभाज्य भाग असतो. मग डॉक्टर, पोलिस, साहित्यिक पुरस्कारांची निवड मंडळे, हे सर्व प्रतिष्ठित वर्गाचे प्रतिनिधी आहेत, ते कधीच आपल्या बाजूने असू शकत नाहीत, असे गृहीत धरून तो वागत असतो. तरी मी त्याला एक-दोन डॉक्टरांबरोबर अगदी वैशिष्ट्यपूर्ण नाते जोडलेलेही पाहिले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी त्याला हृदयविकार असल्याचे उघडकीस आले तेव्हा पाच-सहा महिने प्रयत्न करून अनेक वर्षांपासून असलेली सिगारेटची सवय त्याने पूर्णपणे सोडली. नंतर इसीजी, थ्री डी इको, स्ट्रेस टेस्ट आणि नियमितपणे गोळ्या घेणे या अनुभवाला त्याने आपलेसे केले.

स्वतःच्या 'इमेज'ची मोठी रचलेली इमारत नेहमीच पाठीवर बाळगून वावरणे अनेकदा कठीण होते. तुळसी आता कार्यकर्ता राहिला नाही, समाजात वावरण्याची एक स्वतंत्र सहजता वयाने, घरच्या जबाबदारीने, प्रकृतीने, जगात आणि समाजात झालेल्या बदलांनी, कालांतराने कमी केली आहे, याचा त्याला अजूनही त्रास होतो. याचा राग अनेकदा पत्नीवर उतरत असतोही. तरी तो त्याच्या पद्धतीने नवीन सामाजिक नाती जोडण्याचा प्रयत्न करत असतो. यात काही अडचणी येतात, त्या काही त्याच्या स्वभावातून आणि काही परिस्थितीतून निर्माण होतात. आमच्या दोघांशी जवळीक साधून मैत्री करणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. त्यामुळे सहजतेच्या सोशल लाइफवर मर्यादा येतात. मुंबईच्या महानगरी वातावरणात घडलेल्या या माणसाला औरंगाबादच्या समाजात समरस होण्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागल्या असत्या, त्या त्याने कधी केल्या नाहीत. आणि त्याचा नेहमीच काहीसा आक्रमक पवित्रा काही जणांना आकर्षित करत असला तरी बहुतेक जणांना स्वीकारायला कठीण जातो.

या अडचणींना काही जण एका 'आधुनिकतावादी' लेखकाच्या अडचणी म्हणून पाहू शकतील. महानगरी संवेदन विश्वाला श्रेष्ठ मानणे हा त्याचा हट्ट आहे. भौतिक स्तरावर त्याची स्वायत्तता महानगराच्या रस्त्यांना स्वैरपणे पायाखाली तुडविण्यात होते, तर मानसिक स्तरावर तो जगभराच्या कलाकार-लेखक-तत्त्वज्ञांशी परिचित असतो. ही स्वैरपणे फिरणारी व्यक्ती अट्टाहासाने पुरुषी असते. स्त्रियांचे स्थान त्याच्या या विश्वात एक तर लांबून रोमँटिक प्रेम करण्यासाठी, नाहीतर महानगरातील उपेक्षितांच्या जीवनाचे प्रतीक म्हणून वेश्येच्या रूपात अवतरते. ग्रामीण भागातील ऋतुचक्राची, शेतकऱ्याच्या जीवनाची त्याला फारशी ओळख नसते. आपल्या समाजातील धार्मिक परंपरा, रिती-रिवाज याची बरीच माहिती असली तरी त्यांच्याशी असलेले भावनिक नाते प्रामुख्याने संघर्षाचे असते. जाती-उपजातींमध्ये फारसा रस नसतो. आणि जातीच्या अस्मितेच्या राजकारणाविषयी टीकेची दृष्टी असते. हे सगळे वर्णन बऱ्याच प्रमाणात तुळसीला लागू होते. आजच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत अशा माणसाला कलाकार म्हणून टिकून राहताना वेगळ्याच प्रकारचा संघर्ष करावा लागतो. शिवाय तुळसीचा आज जगाशी येणारा संबंध नोकरी करणाऱ्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या नात्याने आपोआप जोडला जात नाही. जास्त करून कलाकार म्हणून किंवा कुटुंबातला पती, पिता म्हणून येतो. तो सहजासहजी स्वतःला बदलायला तयार होत नाही, म्हणून तो जवळच्या माणसांना अनेकदा ताठर वाटतो. त्याला अनेक वर्षांपासून पैसे कमवण्याच्या दृष्टीने तडजोड करावी लागली नाही, म्हणून व्यवहारातील अनेक गोष्टींबद्दल तो डोळे बंद करू शकतो. आपण रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधण्याची धडपड करत असतो तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया कठोर आणि स्वतःसाठी 'प्रिव्हिलेज'चे स्थान जोपासणाऱ्या असतात.

मला असे वाटते की, तुळसीला या अस्तित्वासंबंधी गेल्या दोन-तीन वर्षांत एका 'क्रायसिस'मधून प्रवास करावा लागला आहे. सर्व काही अत्यंत तीव्रतेने जगण्याच्या त्याच्या अट्टाहासामुळे खूप कष्ट सोसावे लागले त्याला. काही काळ त्याचा मानसिक तोलही बिघडला होता. किंवा आजुबाजूच्या राजकीय वातावरणात मोठे बदल झाले आहेत. त्याच्या पिढीने क्रांतीची जी स्वप्ने पाहिली ती आता आधिकच दूर झाल्यासारखी वाटतात. एवढेच नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जी मूल्ये समाजात व्यापक अर्थाने स्वीकारली जात होती, त्यांच्यावर हल्ला होत आहे. फॅसिसिझम नकळत आपल्यामध्ये येऊन बसतो आहे. अशा वेळी साध्या माणसांच्या, बुद्धिजिवींच्या वागण्यात एक भित्रेपणा येतो. खरं बोलणाऱ्याबद्दलचा संशयीपणा वाढतो. पैसेवाले, प्रतिष्ठित, अधिकारप्राप्त असलेल्या मंडळींबद्दलची लाचार भावना वाढते.

अशा वातावरणात तुळसीसारखा माणूस जरा बावरून जातो. त्याचं सगळं खुल्लम-खुल्लं असतं. तो जरासा ताठरही असतो. अशा माणसाच्या जगण्यावरच आघात झाल्यासारखी परिस्थिती असते. अर्थात थोडासा सावरल्यानंतर तो या नवीन वास्तवाला पुन्हा आपल्या पद्धतीने सामोरा जातो.

असा माणूस जेव्हा बदल स्वीकारतो तेव्हा ती त्याच्यासाठी सोपी घटना नसते. पण ती वरवरची देखील नसते. केवळ आजची 'फॅशन' म्हणून तो आधुनिकोत्तरवादी कविता लिहिण्याच्या प्रयत्नात पडणार नाही. मात्र दुसऱ्या लेखकांनी केलेले प्रयोग समजून घ्यायला तो तयार असतोच. त्याचप्रमाणे त्याची बरी-वाईट प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे सांगून टाकतो. अशा वेळी प्रशंसा करायलाही कचरत नाही. माझा असा अनुभव आहे की, फारच कमी लोक असे वागतात. त्यामुळे अनेक तरुण, प्रतिष्ठित कवी, नाटककार, चित्रकारांना त्याचे खरे मत ऐकण्यात उत्सुकता असते. पण काही अपवादात्मक लेख सोडले तर टीका लिहिण्यात त्याने फारसा रस दाखवला नाही.

आमचे लग्न झाले तेव्हा तुळसी शहाद्याला श्रमिक संघटनेचे काम करीत होता. १९७८ साली त्याने शहादा सोडण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला काही काळ वाचन व लिखाणावर लक्ष केंद्रित करायचे होते. मग १९७९ साली आम्ही औरंगाबादला आलो. तेव्हा तो काही दिवस लाल निशाण पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर जमेल तितके काम करत होता. १९८१मध्ये ओजसचा जन्म झाला आणि मी नोकरी करत असल्यामुळे आणि कुणीही मदतीला नसल्यामुळे तुळसीने बाळाला सांभाळायचे कठीण कामही केले.

ओजस थोडा मोठा झाला तेव्हा तुळसीने औरंगाबादच्या 'अजिंठा' दैनिकामध्ये काही काळ नोकरीही केली. नोकरी पार्ट टाइम असली तरी रात्रीची ड्युटी करून वर्तमानपत्राचे पहिले पान जुळविण्याची सर्व जबाबदारी त्याला सांभाळावी लागायची. तेथून उशिरा घरी आल्यावर तुळसीला त्या दिवशी घडलेल्या गमती, उद्याच्या पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, यावर खूप बोलायचे असायचे. त्या दिवसात मीही लवकर झोपायचे आणि रात्री उठून, त्याला जेवण वाढून, त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून पुन्हा झोपण्याचा कार्यक्रम असे. या पेपरसाठी तुळसीने राजकारणातील तत्कालीन विषयांवर काही विशेष लेख अगदी आवडीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिली. अर्थात, हे लेख आपल्या सृजनात्मक निर्मितीचा भाग होऊ शकत नाही, असे जाहीर करण्यासाठी तो 'ओज पर्व' या टोपण नावाने लिहीत असे. नंतर पगाराच्या बाबतीत फारच उशीर आणि टाळमटाळ होऊ लागली, तेव्हा तुळसीने ही नोकरी सोडून दिली. काही दिवस तुळसीने एका इंग्रजी वर्तमानपत्राचा औरंगाबादमधला बातमीदार म्हणूनही काम केले. तसेच एक-दोन वर्षं तुळसी मुंबईला राहिला, तेव्हा 'नवशक्ति' या दैनिकात त्याने काम केले होते. तर काही दिवस रात्रशाळेत शिक्षक म्हणूनही तो होता.

औरंगाबादेत तुळसीने शिकवण्या कराव्यात असा विषय आमच्यात मधून मधून निघायचा. तुळसीचे इंग्रजीचे वाचन चांगले आहे. गंभीर विषयांवर इंग्रजीत बऱ्याचदा मी त्याला मदत केली आहे. तासन् तास बोलताही येते. शाळा-कॉलेजात असताना त्याने वेळोवेळी परीक्षेत यश मिळवून सचिवालयातली नोकरी आणि त्यातील बढती पक्की केली. पण आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल त्याचे फारसे चांगले मत नाही आणि आता तर त्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुणाला शिकवणे खूप जड जाईल. एकदोन वेळा त्याने प्रयत्न केला, पण तो सोडून दिला. विद्यापीठ परिसरातील काही विद्यार्थ्यांशी त्याचा चांगला संवाद होतो. पण शिस्तबद्ध, अभ्यासक्रमबद्ध नाही. ली इलेसिंगर हे अमेरिकेतील संशोधक जेव्हा फुल ब्राईट स्कॉलर म्हणून औरंगाबादला राहिले तेव्हा त्यांनी आपली मराठी भाषेची जाण वाढविण्याच्या दृष्टीने काही टेक्स्ट वाचण्यासाठी तुळसीची नियमितपणे मदत घेतली.

आपण पैसे कमवत नाही म्हणून स्वतःवर कमीत कमी खर्च करावा ही शिस्त तुळसी पाळतो. त्यामुळे बस/शेअर रिक्षाने फिरायला त्याला आवडते. आणि पायीसुद्धा. हे करत  असताना शहरातल्या साध्या माणसांबरोबर गप्पा मारणे हा त्याचा खास छंद. खिशात काही पैसे असल्यास चोर बाजार किंवा फुटपाथवरून तो अगदी चोखंदळपणे कपडे, पुस्तके, चित्रे, मूर्ती मिळवण्यात पटाईत आहे आणि तेवढ्याच सहजजपणाने तो एखादवेळी ते आमच्या एखाद्या मित्राला-मैत्रिणीला देऊनही टाकतो. त्याच्या काही निवडक मित्रांनी आमचे लग्न झाल्यानंतरसुद्ध त्याला वेळोवेळी पैशाची मदत केली आहे. पण ते पैसे घेण्याचा त्याचा हेतू शान-शौकीचा नसून, एक स्वातंत्र्याची भावना राखण्याचा असतो. अधून-मधून दारू पिण्याचा शौक आहे, तीही चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या गप्पा होण्याची शक्यता असेल तर जरा जास्त प्रमाणात. पण दारू नाही मिळाली तरी फारसे वाईट वाटत नाही किंवा त्यासाठी धडपड करत नाही.

कुठल्याही जुन्या विवाहित जोडप्याप्रमाणे आमचा हा एकत्र केलेला प्रवास सुख-दुःखाचा, चढउतारांचा, प्रेमाचा, रागाचा, संघर्ष-समझोत्याचा झाला आहे. पण तुळसीबरोबर एखादा लहानमोठा प्रवास करायला मोठी ताकद आणि चिकाटी लागते. त्यामुळे मुले लहान असताना मी हे धाडस क्वचितच केले. यावर्षी आम्ही वर्षभर आजारपण, अपघात, मानसिक खळबळ याच्यातून गेल्यानंतर चौघांची आठ दिवसांची दक्षिणेकडची 'ट्रिप' निश्चित केली. दक्षिणेकडील काही स्थळे पाहून पॉण्डिचेरी गाठायचे ठरले. मग मी आणि ओजस मिळून प्रवासाचे वेळापत्रक, आरक्षण, खर्चाची आखणी केली आणि आम्ही निघालो. तुळसीचे या तपशिलाशी काही देणे-घेणे नसते. त्याची भूमिका असते, 'मी तर साधा माणूस आहे. मला काहीही चालते. तुम्ही ठरवा.' मग सगळे निर्णय आमच्यावर ढकलल्यानंतर तो टीका करायला मोकळा असतो. जे चांगले घडेल त्याचे 'क्रेडिट' घ्यायला मागेपुढे बघत नाही. 'बरं झालं तुम्ही माझं ऐकलं' या प्रकारचा आम्हाला तिघांना भरपूर वैताग येता येता आम्ही पॉण्डिचेरीला पोहचेपर्यंत तशी मजाही आली. मुलांनी तुळसीच्या या वागण्याला जोरदार विरोध करायला सुरुवात केली होती. मग एका हॉटेलच्या रूममध्ये अगदी लहान मुलासारखे, 'मग मी आता जातो' इथपर्यंत वेळ आली होती. नंतर मात्र समुद्राचे सान्निध्य आणि पॉण्डिचेरीचे आगळे वेगळे शांततेचे वातावरण यांनी आम्हाला घेरले. आम्ही विसावलो, आमचा सगळा ताण-थकवा निघून गेला.

परत आल्यानंतर तुळसीचे पुन्हा सुरू 'सुटी तशी बरी गेली, पण काहीकाही ठिकाणी नीट जेवायला मिळाले नाही. आणि शेवटी महाबलीपुरम राहिलेच.'

लिहिण्यासारखे तसे खूप आहे. तुळसीबरोबरच्या जीवनाला वेगवेगळे रंग आहेत. आमच्या दोघांच्या एकमेकांच्या कुटुंबियांशी झालेला संपर्क, देवाण-घेवाण, टकरी, प्रेमाचे संबंध या विषयाला मी हातच लावला नाही. आता मुलेही मोठी झाली आहेत. तुळसीचा हा अस्वस्थपणा टिकून राहील, त्याच्या सृजनशीलतेला येत्या वर्षात नवीन दिशा मिळतील आणि आमचे सहजीवन कसेही असले तरी त्यात नवीन काहीतरी घडत राहील, याची मला खात्री आहे.

2 comments:

  1. वंदना सोनळकर यांनी कित्ती प्रगल्भतेने समजून घेतले तुळशी परब यांना...असे उत्कट आणि गतिमान प्रवाही नाते एरवी दुर्मिळच ..!

    ReplyDelete
  2. Sonalkar has expressed several subtle revelations in their mutual life very effectively and appropriately; nevertheless, without considering the institutional dimensions of caste-gender discriminations, the text by Sonalkar about Tulasi apperes to have leanings towards her subjective understanding of Tulasi as an individual. Tulsi's use of abusive language is understood in simplistic equations without considering its complesitis. In other words, it is an attempt to sidetrack the entire issue. This is what I feel...

    ReplyDelete