Friday, September 23, 2011

मी एक कुबडा नार्सिसस


मी एक कुबडा नार्सिसस आहे, कुबडा
बहुप्रसव शेवाळासारखा पण लंगडा
मला माझ्यापास्नं पळून जाता येत नाही
नी डोंगर माझे : पाठीवरचे ओबध धोबड
नी नद्या माझ्या आतड्यातल्या कढतील ते कढ

तुझ्या आकांताच्या एकांतात
मी तुला मधाचे बोट लावीत नाही,
खुशाल दिव्य सुंदरीही म्हणत नाही,
आरसा काजळतो तेव्हा कोसळतात लक्षावधी
नी तुझ्या असण्याच्या स्वातंत्र्यात उगवतात अवधी.

तिथे तू तुझी असतेस, तिथं कुबड असतं साधं
पायांच्या अष्टकोनाचं बळ तसं एरवीचंच लब्ध
नी तुझेही डोंगर, तुझ्याही नद्या
यांची सरमिसळ होता होता
दोघांवर उगवते सोपं असण्याची सामुद्रिकता

आपापल्या अर्थातून विश्ववास्तव घडवावं, जशा लाटा
तू तुझं नी नी माझं, तरी मनातून पूर्ण कोमेजलेला
नार्सिसस नी त्याचं शेवाळातनं घसरणं
ती त्याचं रडणं, त्याचं मोकणं

दोघांना वाटतेय हे खूप खोटं
खूप खूप खोटं

1 comment:

  1. पाणी ही माझी अत्यंत आवडती कविता आहे. थँक्स.

    ReplyDelete