Sunday, September 25, 2011

कुबडा नार्सिसस : मुखपृष्ठ : ब्लर्ब

कुबडा नार्सिसस हा तुळसी परब यांचा कवितासंग्रह लोकवाङ्मय गृहानं मे २००२ला प्रसिद्ध केला. त्याचं हे मुखपृष्ठ नि पाठीवरचा मजकूर अर्थात ब्लर्ब-

मुखपृष्ठ : सुधीर पटवर्धन
‘’FALL’’
1998
Acrylic on Canvas
60’’ x 42’’
Collection : Ravi & Virginia Akhoury, U.S.A.


मुखपृष्ठाविषयी...
फॉल : या चित्रामध्ये दूरवर दिसणारे दृश्य व जवळून दिसणारे दृश्य एकाच वेळी रंगवत असताना करावी लागणारी कसरत चांगल्या रितीने साधली आहे. दूरचे दृश्यही धूसन न भासवता स्पष्टपणे रंगवले आहे. पाठीमागचा डोंगर आणि त्याला जोडल्या जाणाऱ्या उभ्या-आडव्या बांबूच्या रेषा जणू चित्राला आधार देत आहेत. शहरात दाटीवाटीने वसलेली झोपडपट्टीवजा वस्ती दाखवताना, त्यातील बकालपणा चित्रकाराने वगळला आहे. विटांचे बांधकाम असलेली भिंत आणि एकाच ठश्याची पुनरावृत्ती करणाऱ्या टाईल्स जणू नक्षीकामाची शोभा निर्माण करतात. वस्तीतून वाहणाऱ्या नाल्याचे पाणीही निर्मळ दिसते. त्यात निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पडले आहे.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर टाईल्सचे काम करणारा कारागीर एका वाकलेल्या गैरसोयीच्या अवस्थेमध्ये स्थिरावला आहे. जणू तो पडता-पडता स्वतःला सावरतो आहे. ह्या प्रतिमेच्या विरोधाभासात आशावादाचे, उभारीचे प्रतीक भासणारा मैना मान उंच करून गाणे गात आहे.
***

तुळसी परब यांची कविता महानगरी संवेदनेचा एक विशेष असा विस्तार आहे. अरुण कोलटकर आणि मनोहर ओक यांच्या कवितेत सर्वव्यापी ठरलेल्या महानगरी जीवनाच्या संदर्भांची व्याप्ती त्यांच्या कवितेत खूपच मर्यादित झालेली दिसते. असे असूनही दिलीप चित्रे आणि सतीश काळसेकर यांच्या प्रमाणे महानगरी जीवनाचे संदर्भ अध्याहृत ठेवून ते त्यांच्यासारखी प्रतिसृष्टी निर्माण करत नाहीत. उलट महानगरी जीवनाचे वास्तव समंजसपणे स्वीकारून त्यातल्या ताणतणावाच्या आणि दबावांच्या सान्निध्यात आपले कविस्वप्न जागरूकपणे सांभाळतात. महानगरी संस्कृतीतील विनाशकारी भयावहतेला, कंटाळवाणेपणाला, अमानुषतेला फारसा उठाव न देता त्यातून आपली आत्मशोधाची वाट मोकळी करून घेतात. त्यांच्या कवितेतील स्थित्यंतराचे स्वरूपही सतीश काळसेकर आणि वसंत गुर्जर यांच्या कवितेतील स्थित्यंतरापेक्षा वेगळे आहे. त्यांच्या श्रेययात्रेला कविस्वप्नाबरोबरच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील सक्रिय सहभागाचा साक्षात संदर्भ आहे. आत्मविघटनाच्या जाणिवेकडून सामाजिक विघटनाच्या जाणिवेकडे होणारी चंद्रकान्त पाटील यांच्या कवितेची वाटचाल आणि परब यांच्या कवितेतील स्थित्यंतर यांच्यात काहीसे साम्य जाणवते. पण त्यांच्यातील भेद अधिक महत्त्वाचा आहे. चंद्रकान्त पाटील यांच्या कवितेतील स्थित्यंतरात त्याचे आस्तिक्य इतक्या निखळपणे प्रकट होत नाही. उलट आधुनिक जाणिवांच्या विविध नकारातून तावून-सुलाखून निघालेल्या परब यांच्या कवितेतील ‘आस्तिकी सूर’ स्पष्ट होतो. तसेच गुंतागुंतीच्या राजकीय वास्तवाचे नेटके चित्रण करणाऱ्या त्यांच्या कवितेतील सूज्ञ आणि प्रगल्भ राजकीय जाणीव चांगल्या राजकीय कवितेची क्षीण परंपरा असलेल्या मराठी कवितेत विशेष मोलाची ठरते. समकालीन मराठी कवितेतील राजकीय जाणिवेची व्याप्ती वरचेवर वाढतच आहे. म्हणून अशा कवितेचे विश्लेषण आणि मूल्यमापन करताना परब यांची कविता एक संदर्भ चौकट म्हणून मोलाची ठरेल अशी आहे. कवीचे व्यक्तिगत स्वप्न आणि कार्यकर्त्यांची सामाजिक बांधिलकी अशा दुहेरी पेचातील जीवघेण्या ताणतणावातून आत्मशोधाची यात्रा चालू ठेवणारी त्यांची कविता सद्यःस्थितीत महत्त्वाची ठरावी अशी आहे.
- प्रकाश देशपांडे केजकर

No comments:

Post a Comment