Thursday, September 22, 2011

कवीच्या मोठेपणाच्या खुणा

- जयंत पवार

(९ ऑगस्ट २००३ रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेला लेख. परबांच्या 'कुबडा नार्सिसस'च्या संदर्भात)

सुमारे २५ वर्षांचा पैस असलेल्या या कवितासंग्रहात या दरम्यान कवीने पाहिलेल्या, साहिलेल्या आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनाबरोबर अंतरंगात घडलेल्या बदलांची, स्थित्यंतरांची आणि बारीकशा स्पंदनांचीही नोंद यात उमटलेली आहे. तो जगला, जगतो आहे तो काळ आणि त्याचा भवताल 'कुबडा नार्सिसस'च्या रूपाने आपल्याला भेटतो.

साठोत्तरी पिढीतल्या गवगवा झालेल्या कवींच्यामधून दोन नि:संशय मोठ्या ठरणाऱ्या कवींची नावं सतत मागे राहिली. त्यातलं एक नाव म्हणजे मनोहर ओक आणि दुसरं तुळसी परब. योगायोग म्हणजे दोघंही एकमेकांचे सुहृद आणि सदोदित मराठी कवितेच्या आडव्यात जाणारे. (या दोघांचे तिसरे साथीदार नामदेव ढसाळ, जे थोर ठरलेच; पण या तिघांच्याही प्रभावळी एकमेकांवर पडत राहिल्या.) आज मनोहर ओक हयात नाहीत. आणि तुळसी परबांचा 'हिल्लोळ' आणि 'धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता' या दोन कविता संग्रहांनंतरचा 'कुबडा नासिर्सस' हा तिसरा संग्रह तब्बल पंचवीसेक वर्षांनी प्रसिद्ध झालाय. तुळसी परब यांच्या कवी म्हणून असलेल्या मोठेपणाच्या खुणा या संग्रहात मुबलक सापडतात.

एकूण ७१ कवितांचा समावेश असलेल्या या संग्रहाचा पैस मोठा आहे. २५ वर्षांचा काळ यात सामावलेला आहे आणि या दरम्यान कवीने पाहिलेल्या, साहिलेल्या आणि त्याच्या व्यक्तिगत जीवनाबरोबर अंतरंगात घडलेल्या बदलांची, स्थित्यंतरांची आणि बारीकशा स्पंदनांचीही नोंद यात उमटलेली आहे. एका अर्थाने हे कवीचं चरित्र आहे. तो जगला, जगतो आहे तो काळ आणि त्याचा भवताल 'कुबडा नासिर्सस' च्या रूपाने आपल्याला भेटतो.

यातही चार ठळक भाग आणि त्यांच्या आत काही उपभाग (पाडले नसले तरी) आपल्याला स्पष्टपणे दिसतात. त्यांच्याकडे कवीच्या आयुष्यातली वळणं म्हणूनही पाहता येऊ शकतं. सुरुवातीचा भाग हा समाजपरिवर्तनाच्या लढ्यात धुळे-शहाद्यात आदिवासींच्या हक्कांसाठी लढताना जगलेल्या क्षणांचा, तुरुंगातील आठवणींचा, तिथल्या माणसांच्या जगण्याबद्दलच्या समजुतींचा उत्स्फूर्त उद्गार आहे. अगदी पहिल्याच, पाण्यावरच्या कवितेत तुळसी परब प्रतीकात्मक मांडणी करीत भेदक राजकीय भाष्य करतात. त्यांची जात आणि वर्गजाणीव इथे तल्लखपणे प्रकटते. याच्या पुढचा भाग हा 'आता हे कुरूप काढून खूप लांब दौडावसं वाटतंय' या जाणिवेचा आहे. आयुष्यातलं प्रेयस गवसल्यावर थोडा निवांतपणा मिळवण्याचा कवीचा प्रयत्न आहे, पण त्याला आपला संघर्षमय भूतकाळ विसरता येत नाही. आपली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि वाट्याला आलेले नकार, पराभूतता यांच्यासह तो हे नवं आयुष्य स्वीकारू बघतो आहे आणि अविस्मृतीच्या पाशात स्वत:शीच झुंजत घायाळ होतो आहे. तो म्हणतो :

मी एक कुबडा नार्सिसस आहे , कुबडा
बहुप्रसव शेवाळासारखा पण लंगडा
मला माझ्यापास्नं पळून जाता येत नाही
नी डोंगर माझे : पाठीवरचे ओबड धोबड
नी नद्या माझ्या आतड्यातल्या कढतील ते कढ
तुझ्या आकांताच्या एकांतात
मी तुला मधाचे बोट लावीत नाही...

या भागात आईविषयीच्या कवितेचा आणि 'डबक चाळी'चा एक नॉस्टॅल्जिक उपविभाग आहे आणि दुसरा उपविभाग आहे तो मुलांविषयीच्या कवितांचा. 'डबक चाळी'चं वर्णन कवी करतो:

ती डुबते, ती डबाडबा घाईने डुबते,
तिची चिल्लीपिल्ली आंघोळतात, तिच्या मग्न आशयाला
कोऱ्या भाकरीएवढे साधे नव्हे
तर उपासाच्या धोबडदशमीसारखे कंगोरे फुटतात.

या डबक चाळीशी बालपणातल्या आठवणी जोडून घेताना बाबासाहेब आंबेडकरांचं बालपणही इथेच गेलं याची याद देत बाबासाहेबांच्या पुस्तकातून झालेल्या पहिल्या ओळखीशी आठवणींचे बंध जोडत कवी कवितेचा परीघ कसा मोठा करत नेतो आणि एका नाजूक हळव्या नोटवर कविता आणून ठेवतो, ते पाहण्यासारखं आहे.

तिसरा टप्पा हा परब यांनी आपल्या सुहृदांविषयी आणि आदरणीय व्यक्तींना उद्देशून लिहिलेल्या कवितांचा आहे. यात मार्क्स, साल्वादोर दाली, कमर इक्बाल, अशोक वाजपेयी, वा.ल. कुलकर्णी, मनोहर ओक, नामदेव ढसाळ, सुधीर सोनाळकर यांच्यासाठी लिहिलेल्या कविता आहेत. यापैकी मनोहर ओकच्या शेवटच्या अवस्थेविषयीच्या कविता भन्नाट आहेत.

सोन्यासारखे हात माझे, भूक चावून चोथा सांभाळत
मी स्वत:तल्या एकेका ओवीचा अर्थ राह्यलोय आलापत

अशा अचूक शब्दांत मन्या ओक व्यापून राहतो. नामदेव ढसाळसाठीच्या 'सोदी: रांडेच्या इंद्रियाएवढीही नाहीय माझी कविता' हिची तर ग्रेट कवितांत गणना करायला हवी. वालंसाठीची 'मुली गवतावर बसल्या आहेत' ही या सर्वांहून अगदी वेगळी तरलपणे उतरलेली कविता आहे.

शेवटच्या टप्प्यात कवी सृष्टीच्या अगाधत्वापाशी येऊन ठेपतो. तिच्या सौंदर्याचा शोध घेत चिरंतन तत्त्व शोधतो. त्याचं आस्तिक्य स्थूलापासून सूक्ष्माकडे जात अध्यात्म सांगू लागतं. तो म्हणतो :

रे नम्रतेच्या अंगी
चंगीभंगी नसो
जिथे तिथे असो
शुभंकर

जातपात मिटून मरणाने जन्माला सत्संगाच्या लक्ष पाकळ्या फुटोत, असं तो म्हणतो. 'आता एकाच बोटावर झोका घेऊन कबुतराएवढं फुलपाखरु' होण्याची आस बाळगतो. एका प्रखर सामाजिकतेपासून सुरुवात करून शुभंकराच्या कैवल्यापर्यंत कवीचा प्रवास येतो.

तुळसी परब यांच्या कवितेची अनेक वैशिष्ट्ये या संग्रहात प्रकर्षाने प्रकटली आहेत. काही उत्तम व्यक्तिचित्रणात्मक कविता त्यांनी घडवल्या आहेत. उदाहरणार्थ सोजरा लुंगा पाटील यांच्यावरची कविता. परब एके ठिकाणी त्याचं वर्णन करतात :

त्याच्या देहाचे अभंग आळवले जायचे
भर पहाटे
आणि माझ्या ओढून झालेल्या सिगरेटचे
शेवटचे झुरके
तो घ्यायचा आनंदाने विठ्ठलाचा मुका घेतल्यागत

फाशी देणाऱ्या येरवडा तुरुंगातल्या अर्जुन जाधवांवरची कविता अशीच स्पर्शून जाते. याच कवितेत 'मानव्य आधीच सत्वाढ्य ढळलेलं' अशी ओळ ते लिहून जातात. त्यांची शब्दकळाही अनेकदा अनवट रूप घेते. ते एके ठिकाणी लिहितात :

आणि मी म्हणजे सगोत्र ओवरी,
सगळ्यांनी ओवाळून टाकलेली धरित्री

'लांच्छनसुख' असा शब्दप्रयोग ते करतात. 'हेलिकॉप्टरचं तेच तेच मरटेक भुंकणं' म्हणतात. त्यांची शब्दयोजना, त्यातले पलटे, नाद यांतून अनेकदा मनोहर ओक आठवत राहतात. त्यांच्या प्रेमकवितांमध्येही खूप सोसणं आहे, नाकारलं जाणं आहे, हताशा आहे, असोशी आहे आणि प्रगाढ समजूतदारपणाही आहे. स्त्री-पुरूष नात्याचे वेगळे पैलू त्यांच्या 'साधं नेहमीच्या सरावाने सुटणारं', 'कावळा बसतो', 'कोलाहल म्हणजे', 'प्रेमाचं सावट खपाटीला टेकलं', 'मी तुझा एक फोटो' अशा कवितांमधून समोर येतात.

अशा तऱ्हेनं एका कवीचं आयुष्याला समग्रपणे भिडणं आणि आयुष्याबरोबर आपणही व्यापक अन् उत्तरोत्तर खोल होत जाणं, समजूतदारपणे त्याचा स्वीकार करणं या संग्रहातून दिसत राहतं. वाचकही या श्रेष्ठ सर्जनापुढे नम्र होतो. या संग्रहाच्या मुखपृष्ठासाठी नामवंत चित्रकार सुधीर पटवर्धन यांचं 'द फॉल' हे चित्र निवडण्यात प्रकाशकांनी मोठंच औचित्य दाखवलं आहे.

No comments:

Post a Comment