Thursday, September 22, 2011

तुळसी परब यांच्याबद्दल अच्युत गोडबोले

अच्युत गोडबोले यांचं 'मुसाफिर' हे आत्मचरित्र 'मनोविकास प्रकाशना'ने प्रकाशित केलं आहे. यात १९६०च्या दशकातल्या घडामोडींसंबंधी आलेला तुळसी परब यांचा उल्लेख इथे नोंदवून ठेवतोय. काही संदर्भ स्पष्ट होण्यापुरतीच ही नोंद.

पुस्तकातल्या 'आयआयटी' या दुसऱ्या भागामधला एक उपभाग आहे 'डावी वळणं'; त्यामध्ये तुळसी परब यांच्याबद्दल लिहिलेला परिच्छेद -


याच काळात तुळसी परब याच्याशी माझी ओळख झाली. सयानी रोडला कामगार वस्तीत वाढलेला तुळसी परब हा लघुनियतकालिकांच्या चळवळीतला एक ठळक कवी होता. 'हिल्लोळ' हा त्याचा पहिला कवितासंग्रह 'वाचा' प्रकाशनानं काढला. तुळसीनं लिंग्विस्टिक्समधे एम.ए. केलं होतं. तुळसीची शब्दांवर असलेली पकड त्याच्या कवितेतून दिसायची. कीर्ती कॉलेजमध्ये शिकताना जवळच्या समुद्रानं त्याला वेड लावलं होतं. समुद्राची प्रतिमा वेगवेगळ्या रूपात त्याच्या कवितेत सतत डोकावे. समुद्र आणि तुळसी यांची अतूट दोस्ती असल्यामुळे समुद्रावर भटकणं हा त्याचा एक अटळ छंद बनला होता. तुळसीनं थोडा काळ सचिवालयात नोकरी केली. पण तिथे त्याचं मन रमलं नाही. नोकरी सोडून भणंग आयुष्य जगणं त्यानं पसंत केलं. त्याची कविता व्यक्तिवादी नसून सामाजिक भान ठेवणारी होती. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यानं पुढाकार घेतला.
(पान क्रमांक १८०-१८१)

यानंतर 'चळवळ आणि विषण्णता' या तिसऱ्या भागातल्या 'आदिवासी चळवळ' या पहिल्या उपभागातला मजकूर असा आहे-

शहादा चळवळीतला एक खंदा कवी कार्यकर्ता म्हणजे तुळसी परब होता. तुळसी परब माझा मुंबईपासूनचा एक अवलिया बंडखोर कविमित्र होता. लिटल मॅगझिन्सच्या काळापासून तो प्रस्थापितांविरुद्ध कविता लिहीत आला होता. तो आणि मी एकत्र शहाद्याला कधीच नसलो तरी शहादा चळवळ म्हटली की त्याचं नाव घ्यावं लागतंच. एके दिवशी मुंबई सोडून थेट शहाद्याला आदिवासी चळवळीत तो सामील झाला आणि नंतर अनेक वर्षं शहाद्याला राहिला. एकदा श्रीमंत शेतकऱ्यांनी तुळसीवर केलेल्या प्राणघाती हल्ल्यातून तुळसी जरी बचावला तरी त्या हल्ल्यात त्याचा एक हात जायबंदी झाला. कित्येक महिने केईएम हॉस्पिटलमध्ये काढल्यावर त्यानंतर आयुष्यभर एका हातात सळई घालूनच त्याला वावरावं लागलं. या सगळ्या प्रसंगावर त्यानं 'कवी, कविता आणि कुऱ्हाड' अशी सुंदर कविताही लिहिली. यानंतरही नाउमेद न होता त्यानं काम चालूच ठेवलं. तेवढ्यात आणीबाणी घोषित झाली आणि १९७५ साली आणीबाणीविरुद्ध बोलल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक करून विसापूर जेलमधे पाठवलं.
(पान क्रमांक २०४-२०५)

No comments:

Post a Comment