Thursday, September 15, 2011

तुळसी परब

(फेब्रुवारी २००५मधल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तुळसी परब यांची निवड झाल्यानंतर ३१ डिसेंबर २००४ रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेला हा मजकूर)

मराठी साहित्यात साठोत्तरी पिढीने दिलेल्या योगदानात मोठा वाटा आहे, तो लघु अनियतकालिकांचा. 'वाचा', 'असो', 'येरु' अशा अनेक लघु अनियतकालिकांतून दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, गुरुनाथ धुरी, चंद्रकान्त पाटील यांच्या सकस कविता येत.

यातच एक नाव होते, तुळसी परब. अर्थात यातले बहुतेक लेखक-कवी वाङ्मयीन चळवळीतच रमले. पण तुळसी परब यांनी साहित्यिक परिघाच्या बाहेर जात सामाजिक चळवळीत उडी घेऊन थेट समष्टीलाच भिडणे श्रेयस्कर मानले. त्यांची बंडखोरी ही सर्वांगीण होती.

त्याचीच याद ठेवून विद्रोही सांस्कृतिक चळवळीने त्यांना यंदा वाशी येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले आहे. तुळसी परब हे मुंबईतल्या कामगार वस्तीत वाढले. नामदेव ढसाळ आणि मनोहर ओक हे त्यांचे लिट्ल मॅगझिन काळातले बिरादर. परबांचा त्या काळात दलित पँथरशीही संबंध होता.

'हिल्लोळ' हा त्यांचा सुरुवातीचा काव्यसंग्रह कविवर्तुळात बहुचर्चित ठरला. त्या काळात परब मंत्रालयात नोकरी करत होते. साधारणपणे ७०-७२ सालाच्या आसपास तरुणांमध्ये सामाजिक कार्याचे वारे वाहू लागले होते.

जमीनदार-भांडवलदारांच्या शोषणाविरुद्ध उठाव करण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण होऊन महाराष्ट्रात लोकचळवळी उभ्या राहात होत्या.

तुळसी परब, सुधीर बेडेकर, प्रफुल्ल बिडवई प्रभृतींचा 'मागोवा' नावाचा तरुण ग्रुप असाच कार्यरत हाता. त्यासुमारास धुळे, शहादा येथील शेतमजूर आणि आदिवासींच्या पिळवणुकीच्या कथा बाहेर येऊ लागल्या होत्या व त्यांच्यासाठी लढण्याचे आवाहन श्रमिक संघटनेने तरुणांना केले होते.

त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एका भारावलेल्या अवस्थेत तुळसी परब आणि त्यांच्या ग्रुपमधले सहकारी शहाद्याला गेले. १९७३ ते ७९ हा कालखंड परब यांच्या आयुष्यातला एका नव्या संघर्षाच्या धुमाळीचा होता. या काळात ते शेतमजूर-आदिवासींसाठी कुमार शिराळकर, अंबरसिंग महाराज, दीनानाथ मनोहर, वाहरु सोनावणे यांच्या बरोबरीने लढले. तिथल्या जमीनदारांनी गुंडांकरवी मारहाण केली, तीही त्यांनी सहन केली.

परबांना आणीबाणीत 'मिसा'खाली अटक करून अठरा महिने तुरुंगात ठेवण्यात आले होते. या काळातल्या त्यांच्या तुरुंगातल्या कविता श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. पुढे ते संगमनेर येथे विडी कामगारांच्या लढ्यात उतरले होते. 'धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता' आणि 'कुबडा नार्सिसस' हे त्यांचे दोन कलदार कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक पाश्चात्त्य कवींच्या कवितांचे अनुवादही केले आहेत.

त्यांच्या या कार्याचा 'विद्रोही'च्या अध्यक्षपदाने सन्मान होणार आहे.

No comments:

Post a Comment