Friday, September 23, 2011

पाणी : निळेभोर । काळे । सावळे


पाणी : निळेभोर
काळे
     सावळे
          दाटत जाणारे
डोळ्यातल्या पाण्यासारखे
बंदिस्त
     वहाते
ज्यातून हांकाच हांका ऐकू येतात
जुन्या नी घुसमटल्या सारख्या,
पाण्याच्या पातळ्याच पातळ्या दिसतात
     चौथ्यांदाही
     निव्वळ सगळ्या चारच.
पाणी वरचे वरचे
शुभ्र
     चंदेरी रंगाचे
नी पाणी जणू वहातीचे खालचे
म्हणजे दुसरीच जात
          केवळ समजूतदार
गटारासारखी, सर्व सामावून घेणारी
     घाण, गू, म्हैसींचा मळ
     अपरोक्ष शिव्या नी दुष्काळाचा
     दिवाळसण पिढ्यांनी नावाजलेला


पाण्याच्या पिढ्यानपिढ्या नसतात
सरमिसळत सगळ्या वरच्या
          नी खालच्या
पातळ्या सोडून
     स्वतःहून
          स्वतःक्षेत्राहून
वाढीव आक्रमण विस्तारतं
शांततेच्या सगळ्या पायऱ्या घरंगळतात
नी पाणी चढू लागते चढू
          पु रा सा र खे
नी पाण्याची पायरी
          नी
               पायरी
                    कोसळते
पाण्याची हलकी दुर्भेद्य संघटना.


पिढी आहे पाण्याची आधी
की माणसाची जन्म आहे
माणसाचा
की पाण्याच्या आधी
               माणुसकीचा.
जन्म : मरताना रामरक्ष
               पाणी मागणारा
जन्म विभागलेला माणूसपणापेक्षा
कोण कसले पाणी पितो
               यावरून
जन्म –
               जन्मापासूनच
पाण्यातूनही खोटं आक्रमण
शिरतय आपल्यात
नी आपण दुभंगतोय
प्रौढ मतदार संघात.
आधी मिळवलेलं आपलं
प्रत्येक विशेषण
               विरघळून चाललेय
पाण्यात नी फक्त
लिटरचा हक्क
               मिटरचा हक्क
               पाण्याचा हक्क
संपूर्ण सुसंवाद समजूतदारपणाचाही हक्क


जसा नेहमीचाच समजूतदारपणा पाणी दाखवतं
गटारीतून समुद्रात जाऊन मिळण्याचा
तसा
समजूतदारपणा आपणही दाखवतो
संस्कृतीतून विनाशात जाऊन मिळण्याचा.
खालचं पाणी सोज्वळ-साजरं
               वस्तुगत
सहन करते सगळा समूह
नी विझल्या दिव्यागत
खुंटीला टांगते सगळा अर्क
सगळा इसेन्स
               पाण्याचा
या पाण्याची आठवण झाली
प्रतिष्ठ जीवनात
               की कोंदण
सगळं हालतं
          नी भेसळीची लूट
सगळी कोसळत सावरतं


पाणी सावरतं
          सगळंच
पाणी हुकूमाची तामिली
करणारं
पाणी प्रेतावरनं वहाणारं
पाण्याचं अंतरंग नसतंच
माणसासारखं
          माणसाएवढं
किंबहूना सालस.
          पाणी निमूट
          अंदाजासारखं
वाखाणतं आलेले सगळे हुकूम
पाणी असतं ताबेदार
असमान पातळ्यांवर
पण अधिकाचा
           स्वीकार स्वीकारत
पुढची पिढी करते साष्टांग नमस्कार
पुढची पिढी घेते पोझ
आक्रमणाच्या संकटासमोर
शुष्क
          दुष्काळी
               पुराची.


पुराविरुद्ध पोहायचं
की आक्रमणाचं संकट डोक्यावर ठेवायचं
मतभेद विसरायचा
          एकोपा करायचा
की बंधुभावाच्या घोषणांतून
धर्मयुद्ध वाढवायचं


पशुमध्येसुद्धा पाणी सम
               तोल
               राखतं
प्रदेशासारखं पाणी निळं हिरवं
ढग-आकाश जंगल-प्रकाश
व्यापतं
पाणी अंतर वाढवतं
डोळ्यातल्या पाण्यापासूनचे
हृदयातल्या पाण्यापर्यंत
नी त्या पाण्यापासूनचे
परत मानवी पाण्यापर्यंत.
पिढ्यानपिढ्या शक्तीचा अंदाज घेता घेता
रक्ताचं कारंज उफाळतं
पाण्याच्या प्रदीर्घ झऱ्यामधनं
पण पाण्याचा विधी होतो
प्राण्याच्या बळीसारखा
नी पाण्याची झुंड करत नाही
कुठल्याही पिढीला
          इतिहासातून
कायमची बरबाद.


पाणी मिळाले कधी उन्हातून आलेल्याला
नमस्कार केला देणाऱ्याला
म्हणजे कसला असतोय तो विधी.
ती एक जीवघेणी शपथच असते ना
दलिताची
          माझ्या हाती शस्त्र नाही
मी तुम्हाला शरण आलोय पाण्यासाठी
याची.
आई मुलाला पाजते
नी त्याचा आक्रमकपणा थांबवते
स्तनजन्य
          निराशा साकळते
मुलाच्या डोळ्यात.
प्रेमाचा अधिकार
पाडतो त्याच्यावर
          जीवनव्यापी सावली
नी त्याची भावली
नियमित व्याकुळवून टाकणारी
निचरा करणारी
मानते
          अधिकाराच्या गोष्टी
पाण्याच्या चपखल पातळ्या
               नी समष्टी.


समष्टी
          सगळी कष्टीय :
हे सगळे पाण्याच्या पापाचे पाढे
मी वाचता वाचताच निग्रह
          विख्यात होत जातोय.
मी तुम्हाला सांगतोय
ती सगळी पाण्याची हकिगत नाही
ही हकिगत आहे
पातळ्यांवर
जगणाऱ्या दुर्दम्य माणसांची
ही एक प्रच्छन्न व्यथा आहे
नी नुक्ती नुक्ती मिटत चालली आहे
ती संपतेय खाणीतल्या हरताळात
ती हेलावतेय वरळीच्या बहिष्कारात
ती चाचपडतेय नक्सलबाडीच्या उठावात
ती हकीगत आहे
व्याकुळता सोडून सुदृढपणे जगाकडे पहाणारी
ती नाही एक संतत निराशा
ती आहे घाणीचे घमेले
फेकून दिलेले          वरपर्यंत
          खालनं
ती आहे काळाची
               संपृक्त गरज.
नी पाणी मावळतेय हळूहळू
                    शरणांगत.
पाण्याच्या समजूतदारपणातच्या पातळ्या
आताशा मोजता
     येणार नाहीयेत
हळूहळू
     आताशा जळतेय पाणीसुद्धा
हळूहळू
     जाळतेय पाणी सगळं
ज्याला ज्याला वेढून
     पूर्वी ते वहात
          रहात होतं.

No comments:

Post a Comment