- तुळसी परब
हे माझे आत्मचरित्र नव्हे किंवा मी काय काय वाचले याची जंत्रीही नव्हे.
माझ्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींशी, माझ्या लिखाणाचा काही संबंध आहे काय किंवा मी वाचलेल्या काही गोष्टींशी माझ्या जीवनाचा काही संबंध आहे काय, हे पाहण्याचा हा एक प्रयत्न ठरावा.
मी एका गरीब कुटुंबात जन्मलो. माझ्या वडिलांची पहिलीच पिढी शहरात आली होती. आणि तत्कालीन कोकणातल्या लोकांप्रमाणेच माझे वडीलदेखील एका 'मील'मध्ये लिव्हींगच्या खात्यात कामाला होते.
आम्ही तत्कालीन महानगराच्या आखलेल्या पद्धतीप्रमाणे मध्य मुंबईतल्या एका चाळीत रहात होतो. चाळ संस्कृतीत शेजारीपाजारी एकमेकांशी अगदी मोकळेपणानं वागतात. सकाळी सगळ्यांना एकाच नळावर आंघोळ करायची असल्याने आणि दुसऱ्यांना दुसऱ्या नळावर पाणी भरायचे असल्यामुळे बायका पाणी भरीत आणि पुरुष त्यांच्यासमोर 'जय शंभो बंब' म्हणत कायम चट्टेरी पट्टेरी चड्डी घालून आंघोळी करीत.
घाटावरच्या लोकांना पहेलवानी प्रिय असल्यामुळे ते लंगोटावर आंघोळी करीत. आणि दांडपट्टा चालवल्यासारखे अंगाला साबण चोळीत. त्यांचा कितीही साबण आजूबाजूला उडाला तरी त्यांचे फारसे काही वाटत नसे. मात्र पिण्याच्या पाण्यावर आपले शिंतोडे उडू नयेत याची ते अगदी पूर्णपणे काळजी घेत.
मग प्रत्येकाला आंघोळ करून कामावर जायचे असल्याने शिस्त पाळण्याची सवय, सहकार्याची भावना अगदी तेव्हाही महत्त्वाची असल्याचे माझ्या मनावर बिंबले.
मी म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकलो. सातवीनंतर एका हायस्कूलमध्ये माझ्या वडिलांनी मला घातले. त्या काळातील पद्धतीप्रमाणे मी मॅट्रिकपर्यंतच तुला शिकवेन असे त्यांनी सांगितले. स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. अशी सामाजिक शिकवण त्यात अध्याहृत होती.
मला इंग्लिशची आवड म्युनिसिपालिटीतच जडली होती. मी शाळेचा बिल्ला लावायचो. त्याच्यावर काही के.एम.एस.सारखी अक्षरं होती. मी तेवढीच फक्त लक्षात ठेवली. नंतर आयुष्यात कधीतरी फार उशिरा कळले की त्याचा अर्थ क्षत्रिय मराठा समाजाशी होता. त्यानंतर आणखी काही काळाने कळले की आम्ही खरे तर कुणबी होते.
बरे झाले देवा कुणबी केलो।
नाहीतर असतो दंभे मेलो।।
याचा अर्थ आणि तुकाराम कळायला देखील मला एकंदर खूपच वर्षे लागली असे म्हणावे लागेल.
माझे वडील मात्र ही ओळ नेहमी घोळवायचे. आणि तसा कोकणातून आलेला हा माणूस मात्र बऱ्यापैकी शिकलेले असावा. कारण माझ्या आईचे वडील हेडमास्तर होते. हे त्यांनीच मला केव्हातरी सांगितले होते.
घाटावरच्या लोकांच्या गाळ्यात ज्ञानेश्वरी वाचली जायची. कधी भागवत लावायचे. कमाल म्हणजे माझे वडील हे समोर बसून ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगत हे मी अगदी लहानपणी आईच्या मांडीवर डोके ठेवून ऐकत असे. त्यात आदराची भावना जशी असे तसेच वडिलांविषयीचे प्रेमही असे. पण मुख्य म्हणजे मी ऐकता ऐकता झोपी जाई. आणि मग अध्याय संपला की जय हरी विठ्ठल, जयजय विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, अशा घोषणा दिल्या जात आणि वारीतल्यासारखे भजन सुरू होई. या भजनांचा अर्थ सर्वांना ठाऊक होता. ते अत्यंत तंद्रीत, एकात्म होऊन, भजने म्हणत हे मी पाहिलेले आहे. तुकाराम किंवा ज्ञानेश्वर हे त्यांचे परमदैवत होते, हे तर त्यांच्या लय, ठेक्यावरून आणि सतत तुकारामाचे अभंग सांगण्यावरून दिसून यायचे. तुकाराम त्यांना आवडत असे. आपण स्वतःच ती भजनं रचतोय असे त्यांना वाटे, कारण तुकारामाला कोणताच विषय वर्ज्य नाही. आपल्या अस्तित्त्वावर तो केंद्रस्थानी आहे याची जाणीव त्या भोळ्याभाबड्या लोकांनाही होती. आधुनिक मराठी कवितेला ही परंपरा कळायला खूप उशीर झाला.
आधी आपल्याला आपल्या परंपरा ठाऊक हव्यात. त्यातलं बरं-वाईट, श्रद्धा-अंधश्रद्धा कळायलाही हव्यात. मौखिक परंपरा प्रामुख्यानं हे कार्य पार पाडत असतात. पण आधुनिक जीवनाचा स्पर्श झाल्याशिवाय, जीवनातल्या तातडीशिवाय, भौतिक जीवनातल्या धावपळीशिवाय आणि एका विशिष्ट पातळीपर्यंत अक्षरओळख होऊन खऱ्या साक्षरतेकडे आपण वळल्याशिवाय आपण त्यांना खरोखर अर्थ देऊ शकत नाही हेही तेवढेच खरे.
म्हणून साक्षरतेच्या परंपरेनुसार, गाणी, मेळे, भजने, कामागारवर्गीय नाटके, तत्कालीन दिवाळी, होळी हे सण, या सर्वांचा माझ्या अबोध जाणिवेवर आणि माझ्या लिखाणावर कुठेतरी नकळत, अगदी खोलवर परिणाम झाला असणार हेही मी तुम्हाला सांगू शकतो.
एव्हाना मी कॉलेजमध्ये जायला लागलोय. मला दाढी मिसरूड फुटलीय आणि जीवनाच्या नव्या टप्प्यावर आलोय याची जाणीव मला झाली. इथेही तेव्हा सामूहिक जीवन होते. स्त्री-पुरुष, एकत्र जीवन पद्धती, आनंद देण्याघेण्याची तऱ्हा, या गोष्टी होत्या, एकमेकांशी उघड उघड प्रेम करण्याची आणि ते सांगण्याची हिंमत होती. हे मला आजूबाजूला पाहून कळायला लागले. मीही त्यात सामील होतो.
एका श्रमिकाचा मुलगा असल्याने, आधी कधीतरी, 'मला वाटते गाढव व्हावे' अशी कवितेची एक ओळ लिहिल्याचे मला स्मरते. नंतर श्रमातून ही जाणीव विकसित होऊन प्रेमावर आली होती. हायस्कूलात प्रेमकविता वाचल्या होत्या, त्यापेक्षाही चांगल्या कविता लिहाव्यात असे मला वाटले होते.
मी त्यानंतर बऱ्याच प्रेमकविता लिहिल्या, नंतर त्या फाडूनही टाकल्या.
कॉलेजात मी अर्धवेळ शिक्षण घेत होतो. मराठी आणि संस्कृत. संस्कृतचे भय वाटे. गीतेचा एखादा अध्याय, मेघदूताचे कालिदास इतर काही संस्कृत व्याकरण याच्या पलीकडे मी जाऊ शकलो नाही. संस्कृतची भीती हा माझ्यावर सामाजिकदृष्ट्या झालेला मोठा अन्याय होता. तो काढण्यासाठी माझ्या कॉलेजमधील सरांनी मला वि. का. राजवाडेंचा धातुकोश आणि नामधातुकोश वाचायला सांगितले.
त्या दोन ग्रंथांनी आणि फारशी मराठी कोशांनी माझ्यावर आणि माझ्या जाणिवांवर खूप मोठा प्रभाव पाडला. भाषा म्हणजे संस्कृतीची किती विविध आणि विलक्षण समंजस जुळणी असते हे तेव्हा मला कळायला लागले तेव्हा मला छंदोबद्धता, नाद, लय, मुक्तलय या सर्वांविषयी कळायला लागले. आधीपासूनच्या मराठी कवितेने दिलेल्या भाषेवर मी सुरू केलेला संस्काराचा तोही एक भाग होताच.
आतापर्यंत आपण १९६० ते ६५ च्या काळापर्यंत आलो. खूप वाचन झालं. मी पाब्लो नेरूदा वाचला. 'अमेरिका' एका फटक्यात वाचून काढली; परंतु 'ट्रायल'ला मी पुढे जाऊ शकलो नाही. कारण 'ट्रायल' मलाच 'फेस' करायचा होता. डोस्टोव्हस्कीचीसुद्धा मला कादंबरी वाचता आली नाही. मी जी. ए. कुलकर्णीपर्यंतच अडकलो आहे. मराठीतले नंतरच्या काळातील आधुनिक लोक मी वाचलेले आहेत. तुम्ही म्हणाल की तुम्ही अमूक नाटक पाह्यलंय का? तर हो. मी 'सूर्य पाहिलेला माणूस' पाहिलेलं आहे. मी रेहमानची गाणी ऐकलीत. जयदेव मला माहिती आहे. हे सगळं मला माहिती आहे आणि हा सगळा आपल्या संस्कृतीचा भागच असतो. आता हे जर तुम्ही करत नसाल, त्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवर कुठेतरी- आपल्या सांस्कृतिक विश्वात सामावून घेत नसाल, लोकांना, की जे खरंच उत्सुक आहेत, आणि मग वाचन संस्कृती पसरवण्याची जर भाषा आपण करत असू तर ती करावी. आम्ही एकदा कार्यकर्ता म्हणून कार्य केले आहे. परत एकदा वाचन संस्कृती पसरवण्याचं कार्यदेखील करू. ते कार्य खरंतर मी माझ्या कवितांमधून चालूच ठेवलेलं आहे. ते किती लोकांपर्यंत पसरलंय ते कालच्या कवितेला मिळालेल्या प्रतिसादावरून आपल्या लक्षात आलेलंच आहे. एक प्राध्यापक बोलता बोलता म्हणाले की, 'अहो, काय ते अरुण कोलटकर, आणि ही मंडळी यांनी काय कविता लिहिल्यात.' आता तुमच्या मराठी भाषेचं नशीबच असं की बिचारा अरुण कोलटकर मरूनसुद्धा गेला.
अरुणची एक गोष्ट सांगतो आणि मग मराठी कवितेचं काय दिवाळं काढायचं ते तुम्ही काढा. हा अरुण कोलटकर, हा माणूस ज्याने कविता लिहिली तेव्हा त्याला 'कॉमनवेल्थ'चा पुरस्कार मिळाला. मराठी लोकांना तो माहीतसुद्धा नाही. आणि काल एक प्रोफेसर म्हणत होते की अरुण कोलटकर आणि चित्रे ठराविक लोकांसाठी लिहितात आणि बाकीचे 'फिक्शन' लिहिणारे कुणासाठी लिहितात? आणि नाटक लिहिणारे कुणासाठी लिहितात? त्यांनी काय, अरुण कोलटकरांनी लिहिलंय? मग विश्वात ते अमूक कवी आहेत. पण मग अरुण कोलटकरनं नंतर काय लिहिलंय हे तुम्ही वाचलंय का? आत्ता काय लिहिलंय? त्याने कुठल्या पद्धतीने एक मेळा संबंध वारकऱ्यांचा कुठे चाललाय, कसा चाललाय हे तुम्ही वाचलंत? नाही. तर अरुण कोलटकर विषयीची शेवटची गोष्ट सांगून मी माझं कवीच्या चारित्र्याविषयीचं विवेचन थांबवतो.
अरुण कोलटकर आजारी पडला. त्याला कॅन्सर झाला होता. ते त्याला डॉक्टरनं सांगितलं. आणि तो टर्मिनल कॅन्सर होता, हे जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्यानं अशी औषधं उचलली आणि खिडकीतून बाहेर फेकून दिली. अरुण म्हणाला मला टर्मिनल कॅन्सर झालाय तर मला माझ्या वेदना सहन करायला पाहिजेत. मी कवी आहे. मी त्या वेदना सहन करीन. त्यानं ती औषधं बाहेर फेकून दिली आणि तो रोज जसं आयुष्य जगायचा, बसमधनं जायचा, मित्रांना भेटायचा, भावाकडे जायचा. तसा अरुण त्याच्या भावाकडे गेला होता आणि भावाकडनं परत येताना बसमधे कोसळला. कवीच्या कार्याविषयी बोललेलं, मला वाटतं मराठीतल्या एका महान कवीविषयीचं हे विवेचन त्याच्या स्मृतीला वंदन करून मी थांबवतो.
***
'वाचनवेध' या पुस्तकातून हा लेख घेतलाय. हे पुस्तक या ब्लॉगपर्यंत चंद्रकान्त पाटील यांच्यामुळे आलं.
No comments:
Post a Comment