Saturday, May 30, 2015

दोन कवितासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्त्या

परबांच्या 'हिल्लोळ' आणि 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दोन कवितासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्त्या औरंगाबादमधल्या 'साक्षात प्रकाशना'नं ऑगस्ट २०१३मध्ये काढल्या. त्यांची मुखपृष्ठं आणि सोबत मलपृष्ठावर छापलेला मजकूर या नोंदीत एकत्र करून ठेवूया.
***

हिल्लोळ

मुखपृष्ठ- संतुक गोलेगावकर । किंमत- ५० रुपये
कल्पित आणि रंजक साहित्यातून प्रकटणाऱ्या कृत्रिम दुःखाची आणि तथाकथित बुद्धिमंतांच्या वांझोट्या तत्त्वप्रदर्शनाची चिरफाड करणारी तुळसी परब यांची कविता भोवतालचे वास्तव आणि स्वतःचे अस्तित्व यांच्या खाणाखुणा अंगभर गोंदवलेली कविता आहे. अनियतकालिकांची चळवळ आणि दलित जाणिवांचे संवेदन प्रकटण्याच्या काळातच या कवितेने दारिद्र्य, शोषण, स्वातंत्र्य, पाणी, आदिवासींचे जीवन, अशा असंख्य विषयांना कवेत पकडण्याचे सामर्थ्य अभिव्यक्त केले आहे. विषयवस्तू, ध्वनीरचना आणि तात्त्विक दृष्टी या अंगानी दलित कवितेशी ती जवळीक साधते; मात्र विद्रोहाचा तीव्रतर उच्चार ती करीत नाही. चोरचिलटे, हप्तेबाज पोलीस, रांडा, पक्षी यांची जिवंत सृष्टी आणि गेट वे, समुद्र, म्युझियम्स, सिग्नल, स्लम, वेश्यापुरी, ही अविभाज्य अंगं असणारी महानगरीय ठिकाणी यांची गजबज चितारण्याची हातोटी व क्षमता या कवितेने दाखवून दिली आहे. 'स्वातंत्र्य हा सर्वांचाच जन्मसिद्ध हक्क असतो काय?' या मूलभूत प्रश्नालाच केंद्रस्थानी आणल्याने भुकेकंगालांच्या दुनियेतील दुःखाजी गाज तुळसी परब यांच्या कवितेतून सतत ऐकू येते. तथागत बुद्धाच्या आणि दयाघन संतांच्या डोळ्यांतून पाझरणारी करुणा या कवितेच्या नसानसांतून वाहत असल्याने वेदनांचे अंतःस्वर आणि अंतर्यामातून उचंबळून ओसंडून बाहेर पडणारा वेदनांचा आर्त उद्गार हेच 'हिल्लोळ'चे बलस्थान ठरते. घराघरातील किडामुंगी, जीवजंतू यांच्या भुकेशी नाते जोडत संपूर्ण मानवजातीला या कवितेने घातलेली बंधुत्वाची हाक हाच कोट्यवधी दुःखितांचा जाहीरनामा बनतो. म्हणूनच सामाजिक उत्थानासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याची ही केवएळ शब्दांमधून उमलणारी कविता नसून अस्सल माणूसपणाची मोहोर उमटवणारी जितीजागती निशाणी आहे, असे म्हणणे भाग पडते.
- सतीश बडवे
***

धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता

मुखपृष्ठ- संतुक गोलेगावकर । किंमत- ५० रुपये
तुळसी परब यांच्या 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता या कारावासातील कविता आहेत. 'हिल्लोळ'मधील अनेस संदर्भांचा येथे लोप झालेला दिसतो तर काहींचा संकोच झालेला दिसतो. महानगरी जाणिवांतून आलेली नकारात्मकता बरीचशी अध्याहृत झालेली दिसते आणि महानगरी संस्कृतीची जागा कारावासातील संस्कृतीने घेतलेली दिसते. कविस्वप्नातील काव्यात्मक पेच याही संग्रहात पुढे चालू राहतो; पण त्याला सामाजिक जाणिवेची एक विस्तृत चौकट लाभते. परब यांना लागलेला अमर गाण्याचा ध्यास, सुहास-साजणीच्या प्रेमाचा ध्यास आणि मृत्यूची नव्या रूपातील जाणीव या संग्रहातही तेवढीच जिवंत आहे; पण या सर्व जाणिवांना एका सर्वव्यापी सामाजिक आणि राजकीय जाणिवेचा अंकुश आहे. बंदिवासातील मानसिक दबावाचे वातावरण आणि त्यात होणारा कवीचा मानसिक कोंडमारा हा या कवितांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कवीचे व्यक्तिगत स्वप्न आणि त्याची सामाजिक-राजकीय जाणीव यांच्यातील आंतरप्रक्रियेला विशेष अशी काव्यात्मकता लाभते. म्हणून परब यांच्या कवितेतील या स्थित्यंतराचे स्वरूप लक्षात घेणे महत्त्वाचे आहे
- प्रकाश देशपांडे केजकर
***

No comments:

Post a Comment