Sunday, December 24, 2023

तुळसी परब : आठवणींच्या उजेडात

चंद्रकांत पाटील

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ३० सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झालेला हा लेख पाटील यांच्या परवानगीने इथे नोंदवतो आहे.


तुळसी परब
तुळसी परब नावाचा एक कोमल कठीण हृदयाचा कवी कालवश होऊन चार वर्षे झालीत. तो जिवंत असता तर ३० सप्टेंबरला त्याला ८० वं वर्ष लागलं असतं. ऐन तारुण्यात तुळसीनं ज्याच्यासोबत साहित्यातली बंडखोरी केली त्या राजा ढालेची पण जन्म तारीख ३० सप्टेंबरच असावी हा विलक्षण योगायोग आहे.

तुळसीच्या कवितेला कारणीभूत झालेल्या त्याच्या आयुष्यातल्या चढउताराबद्दल स्थूलमानानं बऱ्याच लोकांना माहिती आहे. आरंभीच्या काळातल्या आयुष्यावर लिहिलेली सात तुकड्यातली एक मोठी कविता त्याच्या “हिल्लोळ” या पहिल्याच संग्रहात आहे. अगदी पहिल्यापासूनच उत्कट संवेदनशीलता, बालसुलभ कुतूहल, निसर्गाचं आकर्षण, स्वत:च्या भावनांकडे तिर्हाइतपणे बघण्याची मानसिकता आणि जगण्याचा, मरणाचा, नात्यांचा शोध घेण्याची वृत्ती असलेल्या तुळसीनं त्याला झालेलं मुंबईच्या जगाचं दर्शन आपल्या कवितेत शब्दांकित करण्याचा सतत प्रयत्न केला. पण हे शब्दांकन क्वचितच सामाजिक वास्तव म्हणून उघड उघड मांडलेलं आहे. त्याच्या बऱ्याच कविता ‘ इम्प्रेशनिस्टिक ‘ पद्धतीने लिहिलेल्या आहेत. त्याच्या मनातल्या संवेदनशील पटलावर उमटलेली ती चित्रं होती. त्याच्या काही कविता १९६३-६४ च्या सुमारास ‘सत्यकथे’त प्रकाशित झाल्या होत्या. ‘स्वप्नांची संगती लागत नाही जेव्हा सेवनटीसेवन / कुर्ला वार्डमधल्या सुजाण वस्तीत एक नवीन-/ झाड अचानक उमलते कुसुम् कोमल श्रावणधारांशिवाय /अचानक उगवते कुठल्याही सबबीशिवाय ’ या त्यातल्याच ‘झाड’ मधल्या सुंदर ओळी आहेत. मात्र नंतर त्यानं कधीही ‘सत्यकथे’त लिहिलं नाही. त्यामागे त्याची तात्विक भूमिका होती. तुळसीची तात्विक भूमिका म्हणजे कवी- लेखकांवर संपादकांनी व टीकाकारांनी लादलेली बंदिस्त चौकट झुगारून देणं आणि सौंदर्याचा व रूपाचा अतिरिक्त हव्यास असलेल्या साहित्यिक व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणं. जगण्यातले फक्त ‘गाळीव’ अनुभवच घेऊन त्यांना चौकटीत बसवून सुशोभित करणं तुळसीला पटायचं नाही. याची मुळे तुळसीच्या त्या काळातल्या एका चौकटीबाहेर असलेल्या समूहसंबंधात होती. या समूहात मनोहर ओक, नामदेव ढसाळ आणि तो असा एक घट्ट त्रिकोण होता. शिवाय अरुण कोलटकर, अशोक शहाणे, भाऊ पाध्ये, राजा ढाले, वसंत दत्तात्रेय गुर्जर, सतीश काळसेकर,असे अवा गार्द लेखक-कवी होते. गुरुनाथ धुरी होता. आणि अगदी आत्मीय असे सुधाकर बोरकर, एकनाथ पाटीलही होते. या सगळ्यांमध्ये सतत साहित्यावर संवाद होत असे, झडझडून चर्चाही होत असे.

१९६३- ६६ तुळसीच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षं होती. या काळात मुंबई मराठी साहित्य संघाच्या महाविद्यालयात तुळसीने जे काही आत्मसात केलं त्यापेक्षा कितीतरी जास्त पट कीर्ती महाविद्यालयाच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात तासन-तास बसून केलेल्या वाचनात मिळवलं. एझ्रा पौंड-रिल्केच्या कवितांसोबतच पाब्लो नेरुदा-बर्तोल्त ब्रेश्त कवितांशी भिडणं त्याला आवडायचं. तुळसीने भाषाशास्त्रात एम.ए. केलं होतं आणि त्यामुळे त्याचा मुळातच असलेला शब्द-संमोह जास्तच वाढीस लागला होता. त्याच्या शेवटच्या संग्रहातल्या कवितांमध्ये या शब्दसंमोहाची असंख्य उदाहरणं जागोजागी विखुरलेली दिसतात.

१९६०च्या सुरुवातीला अशोक शहाणे’ ‘असो’ नावाचं अनियतकालिक काढायचा. असोसोबतच ‘ आत्ता’ नावाची पर्णिका असायची. तिच्यावर ‘कल्पना: राधिका जयकर’ आणि ‘संपादन:राजा ढाले’ अशी नावं असायची. कालांतरानं पुढे राजा ढाले बरोबर ‘आत्ता मध्ये तुळसी परब आणि वसंत दत्तात्रेय गुर्जर अशीही नावं जोडली गेली. राजा, तुळसी आणि वसंत गुर्जर यांनी ‘येरू’ नावाच्या लघुनियतकालिकाचं संपादन केलं होतं. राजा आणि तुळसी हे बाबुराव बागुल यांनी १९७३ मध्ये संपादित केलेल्या एका दर्जेदार अशा ‘आम्ही’ नावाच्या दिवाळी अंकाचे सहसंपादक होते. याच अंकात भाऊ पाध्ये यांची एक दीर्घ मुलाखत आणि एक कथा होती; तीच कथा पुढे विस्तारून भाऊने ‘राडा’ नावाची कादंबरी लिहिली होती.

एम ए झाल्यावर तुळसीला सचिवालयात नोकरी मिळाली आणि त्याच्या जीवनाला स्थिरता येईल असं त्याच्या मित्रांना वाटलं. पण तुळसीचं मुक्त आयुष्य सचिवालयाच्या भिंतीत आणि फायलीत गुंतू शकलं नाही. मुंबईतल्या कामगार वस्तीत राहिल्यामुळे आणि महाविद्यालयीन व विद्यापीठीय जीवनामुळे त्याला समाजातल्या प्रचंड विषमतेची जी खोलवर जाणीव झालेली होती ती सचिवालयातल्या वातावरणात आणखी विस्तारली. याची संगती लावतानाच त्याच्या मनात मार्क्सवादी विचारांचं बीज रुजत गेलं. दाहक अनुभवांच्या आणि अभ्यासाच्या बळावर त्याला मार्क्सवादाचं अधिक आकलन होत गेलं. या अस्वस्थ काळात तुळसीला समुद्र जास्तच प्रिय वाटू लागला.समुद्राच्या खळाळत्या लाटांचा समोर, अथांगतेसमोर त्याच्याआत धडका देणाऱ्या अस्वस्थतेच्या लाटांना शांत करण्यासाठी तो रात्र रात्र समुद्रासमोर बसत असे. तुळसीच्या या विलक्षण समुद्रप्रेमाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल गुरुनाथ धुरीने ‘समुद्र’ नावाची एक अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. तुळसीच्या अखेरच्या संग्रहातल्या एका कवितेतही तुळसीने लिहिले आहे “माझ्या हृदयात एक समुद्र असतो / मुठी एवढा”. दुसऱ्या एका कवितेत त्याने मजरूह सुलतानपुरीच्या ‘काला पानी’ मधल्या गझलेच्या दोन ओळी उद्धृत केल्या आहेत : “ हम बेखुदी में तुमको पुकारे चले गये / सागर में जिंदगी को उतारे चले गये “. यातल्या ‘सागर’च्या उर्दू आणि मराठी अशा दोन्ही अर्थांवर तुळसीचं गाढ प्रेम होतं. आपल्या प्रियतम समुद्राला सोडून तुळसी अचानक शहाद्याला गेला आणि श्रमिक संघटनेच्या कामात पूर्णपणे झोकून घेऊन तुळसीच्या आयुष्याचा सांधा बदलला. शहाद्याच्या जगात त्याच्या अनुभवक्षेत्राचा परीघ बराच फैलावला, जगण्यावरची श्रद्धा बळावली आणि क्रांतीशिवाय विषमता जाणं व समता येणं शक्यच नाही यावरचा त्याचा विश्वास घट्ट झाला. त्याच्या कवितेतली सुरूवातीची साहित्यकेंद्री अवस्था नेपथ्यात गेली आणि प्रखर वास्तवाच्या मंचावर आल्यामुळे त्याची कविता अधिकाधिक सरळ, सोपी, थेट भिडणारी होत गेली. मात्र काही वर्षांनी याही आयुष्याला आणखी एक कलाटणी मिळाली. तुळसीवर शहाद्यातील जमीनदारांच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. उपचारासाठी म्हणून त्याला काही महिने धुळ्याच्या सरकारी दवाखान्यात काढावे लागले. इस्पितळात एकाकी पडून राहणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे थंड पुनरावलोकन करून भविष्याचा वेध घेण्यासाठी एक थांबा असतो. इथे असताना तुळसीची एक संस्मरणीय मुलाखत अनिल बांदेकरने घेतली होती. त्या मुलाखतीचा आणि तुळसीच्या ‘पाणी’ या एका अप्रतिम कवितेचा हिंदी अनुवाद रतलामहून निघणार्या “आवेग” या लघुनियतकालिकात छापून आला होता आणि त्याचं हिंदी वाचकांनी बरंच कौतुक केलं होतं. हिंदी साहित्यजगाशी आलेला तुळसीचा हा पहिला प्रसंग होता. या काळातल्या तुळसीच्या कविता प्रखर साम्यवादी विचाराशी बांधिलकी मानणाऱ्या होत्या. त्याच्या बांधिलकीच्या कवितांचा परमोच्च बिंदू त्याने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगत असताना लिहिलेल्या कवितांत आहे. यातील काही निवडक कवितांचा एक छोटेखानी संग्रह “धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता” सुधाकर बोरकर या त्याच्या लाडक्या मित्रानं प्रकाशित केला होता. तुळसीची साम्यवादावरची निष्ठा पुस्तकी नव्हती. ती त्याला छळणाऱ्या प्रमेयांची उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नातून आलेली होती. त्याच्याच भाषेत “लढायचंअसेल तर राजकारणाशिवाय अशक्य आहे...आधी नुसतीच कविता लिहिणं होतं. आता कवितेतून लोकांकडे आणि लोकांकडून कवितेकडे असा एक अखंड प्रवास सुरु झाला ...” साम्यवादी पूर्वसूरींच्या कवितांपासून त्याच्या कविता वेगळ्या होत्या त्या अनुभवांच्या मुळाशी जाऊन चिंतनामुळे दररोजचं जगणं आणि बाहेरच्या जगाचा, समाजाचा ताण यातला गुंता सोडवण्याच्या प्रयत्नात आलेलं राजकीयतेचं भान तुळसीच्या कवितेला स्वत:ची खास मुद्रा मिळवून देतं. म्हणूनच त्या काळी मी त्याच्याबद्दल “ समकालीन मराठी कवितेतला राजकीय जाणिवेचा पहिला कवी” असं म्हटलं होतं.

इथं तुळसीबद्दलची एक आठवण सांगितली पाहिजे. भोपाळच्या “भारत भवन”ने भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या दर्जेदार कवींना निमंत्त्रित करून त्यांचं काव्यवाचन ठेवायचं, सोबत त्यांच्या कवितांचे हिंदी अनुवादही सादर करायचे आणि त्या जाहीर कार्यक्रमांचे व्हिडिओ करून ठेवायचे अशी एक व्यापक राष्ट्रीय योजना आखली होती. यातला पहिला कार्यक्रम पूर्व भारतातल्या कवींवर झाला आणि दुसरा कार्यक्रम ८,९,१० ऑगस्ट १९८२ ला आयोजित केला गेला होता. यात फक्त पश्चिम भारतातले कवी होते. ‘अपरा’ नावाच्या या कार्यक्रमात मराठीचे जुन्या पिढीतले मनमोहन, समकालीन पिढीचे तुळसी परब व नामदेव ढसाळ असे तीन कवी आणि लाभशंकर ठाकर, गुलाम मोहम्मद शेख आणि सीतांशू यशश्चंद्र असे गुजराथीतले प्रख्यात कवी आमंत्रित होते. हा कार्यक्रम दिलीप चित्रे भारतभवनच्या ‘वागर्थ’चा निदेशक होण्यापूर्वीच्या तीन-चार वर्ष आधीचा होता. या कार्यक्रमात तुळसीनं सादर केलेल्या तिन्ही कविता “ धादांत… “ मधल्या होत्या. मनमोहनांच्या कवितांनी फारच निराशा केली, नामदेव ढसाळ त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आलाच नाही. त्यामुळे तुळसीच्या कवितांबद्दल लोकांना फारशी उत्सुकता नव्हती. पण आश्चर्य म्हणजे तुळसीच्या कवितांना हॉलमध्ये गच्च भरलेल्या कविताप्रेमी रसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या मानानं लाभशंकर ठाकर वगळता कुणाचाही प्रभाव पडू शकला नाही. त्या तिन्ही दिवसांचं आकर्षणकेंद्र तुळसीच होता. त्यातच ‘कला वार्ता ’ या भारत भवनच्या नियतकालिकासाठी तुळसीची एक दीर्घ मुलाखत घ्यायचं ठरलं. ही मुलाखत आजचा आघाडीचा हिंदी कथाकार उदय प्रकाश आणि आघाडीचा हिंदी कवी मंगलेश डबराल यांनी घेतली होती. मुलाखत सुमारे चार तास चालली. ‘कला वार्ता’च्या नंतरच्या अंकात तुळसीचा एक भला मोठा फोटो छापून आला पण मुलाखत मात्र आली नाही. कारण मुलाखतीच्या टेप्स खराब झाल्यामुळे काहीही शब्दबद्ध होऊ शकले नाही.

तुळसी आणि वंदना सोनाळकरचं लग्न झालं तेव्हा वंदनानं नोकरी करायची आणि शहाद्याच्या हल्ल्यात शारीरिकदृष्ट्या जर्जर झालेल्या तुळसीनं कवितेत आणि साहित्यात पूर्णपणे स्वतःला गुंतून घ्यायचं असं ठरलं होतं. नोकरीच्या निमित्तानं वंदना आणि तुळसी औरंगाबादला आले आणि स्थिरावले. हळू हळू तुळसीच्या कवितेनं पुन्हा एकदा एक वेगळं वळण घेतलं. तुळसीला तसंही भौतिकतेच आकर्षण नव्हतं. त्याच्या गरजाही कमी होत्या. त्याच्या अंगावर जाडीभरडी खादी असे आणि ती त्याच्या बेबंद वाढलेल्या दाढीला मॅच होत असे. एका कवितेत त्यांनी लिहिलं आहे: “भौतिक मरण मेलो आधिभौतिक जीवन जगलो / संतांमधला आणि स्वत:मधला भेद विसरलो”. तरीही अधून मधून त्याला अपराधी वाटत असे; घरासाठी थोडीफार आर्थिक मदत केलीच पाहिजे या विचाराने तो चिंताग्रस्त होई. या जाणिवेतून त्यानं काही काळऔरंगाबादच्या एका दैनिकात नोकरीही केली. शिवाय नॅशनल बुक ट्रस्टसाठी एका प्रख्यात उडिया लेखकाच्या --बहुदा गोपीनाथ मोहांतीच्या- कादंबरीचा मराठी अनुवादही केला आणि त्यात त्याला थोडेफार पैसेही मिळाले, पण पुढे ती कादंबरी प्रकाशित झाली की नाही हे काही कळलंच नाही. नोकरीच्या शोधात काही दिवस मुंबईतही राहण्याचा त्यानं अयशस्वी प्रयत्न करून पाहिला. औरंगाबादच्या आयुष्यात पुन्हा एकदा कम्युनिस्ट पक्षात सक्रिय व्हायचा प्रयत्नही करून पाहिला, पण जन्मजात अस्वस्थता आणि अधून मधून उद्भवणाऱ्या शारीरिक यातना, विशेषतः हृदरोगामुळे, ते काही शक्य झालं नाही.

तुळसीचा पहिला छोटेखानी संग्रह ‘ हिल्लोळ” (१९७३, २०१३) वाचा प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला होता. त्यात त्याचा आत्मस्वरच प्रखर होता. दुसऱ्या “धादांत आणि सुप्रमेय्यमधल्या मधल्या मधल्या कविता” (१९७७,२०१३) संग्रहात तीव्र राजकीय जाणीव होती. तिसऱ्या “कुबडा नार्सिसस” (२००२) मधल्या अर्ध्या भागात “धादांत…” चा विस्तार होता तर उरलेल्या अर्ध्या भागात इम्प्रेशनिस्ट स्वरूपाच्या कविता होत्या. या संग्रहाचं मुखपृष्ठ त्याचा जवळचा मित्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार सुधीर पटवर्धनचं होतं. तुळसीला चित्रकलेची सूक्ष्म जाण होतीच आणि त्याला आंतरिक नातं वाटायचं ते वॅन गॉख या ‘एक्सप्रेशनिस्ट’ चित्रकाराशी. वान गोखचं समुद्र आणि त्यातल्या दोन एकाकी बोटीचं फारसं प्रसिद्ध नसलेलं एक चित्र त्याला फार आवडत असे.

मधल्या काळात तुळसी शांत आहे आणि त्याच्या कविता मंदावल्या असाव्यात असं वाटत असतानाच त्याचा ३५१ कविता असलेला जाडजूड संग्रह “हृद” (२०१६) प्रकाशित झाला. या संग्रहातल्या कवितामध्ये तुळसीच्या कवितेनं आणखी एक वळण घेतलं होतं आणि त्याची कविता अधिक प्रौढ, अधिक गंभीर झाली . या संग्रहात त्याची भाषेशी असलेली लडिवाळ जवळीकही प्रकर्षानं दिसून येते. हा त्याच्या आणि मनोहर ओकच्या कवितांमधला एक समान धागा आहे. पण मनोहरच्या कवितांची आशयसूत्रे मात्र तुळसीच्या कवितांसारखी एकाच वेळी आत्मकेंद्री आणि लोककेंद्री नाहीत. तुळसीच्या कवितांचं नातं नामदेव ढसाळशी अधिक जुळणारं आहे. तुळसीनं “मनोहरच्या ८० कविता ” या संपादनात तुळसीने लिहिलेल्या लेखावरून मनोहरच्या कवितांची जशी उकल होते तशीच तुळसीची कवितेविषयीची सूक्ष्म आणि स्पष्ट जाणही लक्षात येते. ‘हृद्’ या संग्रहाचा आवाका बराच मोठा आहे. यात मरण, जगण्यातील गुंतागुंत, व्यक्ती आणि समष्टीतलं परस्परात रुतून बसलेलं नातं, यांचं व्यामिश्र स्वरूप आहे. महत्त्वाचं म्हणजे या संग्रहातल्या कवितांचा फार मोठा भाग ‘तू-मी’ वरच्या कवितांनी व्यापलेला आहे.. या प्रकारच्या एकूण ६५ कवितांत कुठेही मध्यमवर्गीय चाकोरीतल्या अभिरुचीने ग्रासलेली भावविवशता नाही. ‘तू- मी’ या स्त्री-पुरुष नात्यातली जटिलता आधिभौतिक पातळीवरून हाताळण्याचा तुळसीचा हा अद्भुत प्रयास आहे. भाषेच्या अंत:स्तराशी भिडण्याच्या तुळसीच्या अंगभूत सवयीमुळे आणि मनातल्या विलक्षण गुंतागुंतीमुळे या कविता काहीश्या दुर्बोध आणि अनाकलनीय पण झाल्या आहेत. साधारण वाचकांपासून ते कवितेच्या विशेष वाचकांसाठीही त्या आव्हानात्मकच आहेत.

तुळसीनं आईवर बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्याच संग्रहांत विखुरलेल्या आहेत. आईच्या शेवटच्या रात्रीवर लिहिलेली त्याची एक अप्रतिम कविता पहिल्याच संग्रहात आहे. एखाद दुसऱ्या कवितेत वडिलांचा, वहिनीचा, मुलाचा, बायकोचा उल्लेख येतो. पण लोकांवर आणि मित्रांवर उत्कट प्रेम करणाऱ्या तुळसीच्या कित्येक कविता तुळसीनं मित्रांना आणि इतरांना समर्पित केल्या आहेत. यात मनोहर ओक आणि नामदेव ढसाळ बरोबरच तुरुंगातले सोजरा लुंगा पाटील सारखे कैदी आहेत, येरवडा जेल मधले अर्जुन जाधव आहेत, कार्ल मार्क्स आहे, ओर्तेगा आहे, हिमेनेझ्साराखा श्रेष्ठ कवी आहे ,साल्व्हादोर दली आहे, अशोक वाजपेयी आहे, कमर इकबाल नावाचा मराठवाड्यातला उर्दू कवी आहे, आणि वा.ल.कुलकर्णीसुद्धा आहेत. सुधाकर बोरकर आणि एकनाथ पाटील या मित्रांना तर पहिलाच संग्रह अर्पण केलेला आहे.

तुळसी आपल्याच शर्तींवर उत्कटपणे जगला, उत्कटपणे राजकीय बांधिलकीवर प्रेम केलं, त्याची किंमतही चुकवली. जगणं आणि कविता यातलं द्वैत मिटवण्याचा प्रयत्न केला. भाषा पणाला लावली आणि लिहिलं . शेवटी भाषा पणाला लावणे हा कवितेचा एक (पण एकमेव नव्हे) निकष असेल तर तुळसीची कविता श्रेष्ठतेच्या जवळ जाणारी आहे हे नक्कीच. तुळसीची कविता आजच्या सार्वत्रिक वातावरणात किती अगत्याची आहे हे त्याच्या कवितेचं समग्र आकलन केल्याशिवाय नव्या पिढीला कळणेच शक्य नाही.

No comments:

Post a Comment